बीजिंग : जगातील सर्वाधिक मोठा आयफोन उत्पादन प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॉक्सकॉनच्या कारखाना परिसरात चीन सरकारने बुधवारी लॉकडाऊन लावले आहे. या लॉकडाऊनमुळे तब्बल ६ लाख लोक आपल्या घरांत बंदिस्त झाले आहेत. मध्य चीनमधील झेंगजाेऊ येथे हा प्रकल्प आहे.
या परिसरात कोरोना साथीचा उद्रेक झाला आहे. साथीपासून वाचण्यासाठी येथील कामगार मोठ्या प्रमाणात घरेदारे सोडून निघून चालले होते. त्यामुळे इतर भागांत साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.मध्य चीनच्या झेंगजाेऊ एअरपोर्ट इकॉनॉमिक झोनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड प्रतिबंधक स्वयंसेवक आणि अत्यावश्यक कामगार वगळता इतर कोणालाही घरे सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अनेक कर्मचारी नाराज
अनेक कर्मचाऱ्यांनी प्रकल्पातील दुरवस्थेबद्दल ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा नसल्याचे लोक सांगत होते. कोविड निर्बंध लागल्यास आपण अडकून पडू या भीतीने लोक पायीच कारखाना परिसरातून बाहेर पडत असल्याचे दिसून आले होते.
न्यूक्लिक ॲसिड टेस्ट बंधनकारक
झेंगजाेऊ शहराच्या प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मोजके महत्त्वाचे अपवाद वगळता सर्व व्यवसायांसाठी वर्क फ्रॉम होम बंधनकारक करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवा व पुरवठा वाहनांनाच रस्त्यावर परवानगी देण्यात आली आहे. झेंगजोऊमध्ये ६ लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. सर्व नागरिकांना रोज न्यूक्लिक ॲसिड टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनमानी लॉकडाऊन
चीन सरकारकडे कोविडसाठी कोणतेही निश्चित धोरण नाही. प्रशासन सातत्याने मनमानी लॉकडाऊन लावताना दिसून येत आहे. सामूहिक तपासण्या आणि दीर्घकालीन विलगीकरणासारखे मनमानी उपायही योजले जात आहेत.