ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 21 - अंतराळवीरांना जास्तीत जास्त आरामदायक आणि सर्वसुविधा असलेले स्पेससूट उपलब्ध व्हावेत यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाकडून एका खास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत नासाने मलमूत्र, मासिक पाळी मॅनेजमेंट सिस्टमसाठी डिजाइन्स मागवले होते. या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये निवडण्यात आलेल्या एका स्पेससूटमुळे अंतराळवीरांना सहा दिवसांसाठी स्पेससूटमध्येच मलमूत्र जमा करता येणं शक्य होणार आहे.
निवडण्यात आलेल्या डिजाईन्सना वेगवेगळ्या विभागांमध्ये 20 लाखांचं बक्षिस देण्यात आलं आहे. या नव्याने डिजाइन्स करण्यात आलेल्या कपड्यांमध्ये अंतराळवीरांकडून वापरण्यात येणा-या स्पेससूट्सला जास्तीत जास्त आरामदायक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
10 लाखांचं पहिलं बक्षिस डॉक्चर थैचर कार्डन यांना देण्यात आलं आहे. त्यांनी 'स्पेस पूप चँलेंज'साठी डिजाइन तयार केलं होतं. 'टीम स्पेस पूप यूनिफिकेशन ऑफ डॉक्टर्स'ना त्यांच्या 'एअर पावर्ड स्पेससूट वेस्ट डिस्पोजल सिस्टम' डिजाइनसाठी दुसरा क्रमांक आणि 6 लाख 70 हजाराचं बक्षिस देण्यात आलं. ब्रिटनच्या हुगो शेले यांनी डिजाईन केलेल्या 'स्विमसूट झीरो ग्रॅव्हिटी अंडरवेअर फॉर 6-डे यूज'साठी 3 लाख 35 हजारांचं बक्षिस देण्यात आली.