बीजिंग: चीनमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असल्याने भारत, जपान व अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. चीनमध्ये ८ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत देशात ६० हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, असे चीनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. चीनच्या पेकिंग विद्यापीठाच्या संशोधनानुसार, ११ जानेवारीपर्यंत देशातील ६४ टक्के लोकसंख्येला म्हणजे ९०० दशलक्ष लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. (वृत्तसंस्था)
४ लाखांहून अधिक लोकांचे आवागमन
८ जानेवारी रोजी चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सीमा खुल्या केल्या. तेव्हापासून ४ लाखांहून अधिक लोक चीनमध्ये आले आणि चीनमधून बाहेरच्या देशांमध्ये गेले. २ लाख ४० हजार लोक चीनमधून अन्य देशांमध्ये गेले आहेत.
जपान : लाखावर बाधित
जपानमध्ये एका दिवसात १ लाख ४४ हजार ७७ नवे रुग्ण आढळून आले. राजधानी टोकियोत ११,२४१ रुग्ण सापडले असून, मृतांची संख्या ४८० झाली आहे.
स्मशानभूमीच्या बाहेर रांगा
चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीवर नजर ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांच्या म्हणण्यानुसार, शहरांमध्ये स्मशानभूमीबाहेर वाहनांची रांग आहे; गावात असे नाही, इथे लोक शवपेट्यांमध्ये मृतदेह घेऊन स्मशानभूमीबाहेर रांगा लावत आहेत.
१७९ नवे रुग्ण, भारतात आढळले
- भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७९ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३० ने घटून २२२७ वर आली आहे.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी ८ वाजता अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन रुग्णांमुळे बाधितांची एकूण संख्या ४.४६ कोटीवर पोहोचली आहे.