इस्लामाबाद- पाकिस्ताननं सैन्याला बळकटी देण्यासाठी 600 रणगाडे सैन्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यात रशियात तयार करण्यात आलेले टी-90 रणगाड्यांचाही समावेश असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान या रणगाड्यांना भारताला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर तैनात करणार आहे. पाकिस्तान सैन्यात सामील करत असलेले रणगाडे 3 ते 4 किलोमीटर मारा करू शकतात. त्यामुळे भारतानं आतापासूनच सतर्क राहण्याची गरज तज्ज्ञांनी वर्तवली आहे.रणगाड्यांशिवाय पाकिस्तान सेना 150 एमएम एसपी माइक-10 गन्सही खरेदी करणार आहे. पाकिस्तान सरकार या गन्स इटलीतून खरेदी करत आहेत. ज्यात 120 गन्सची डिलिव्हरी झाली आहे. पाकिस्तानची नजर टी-90 रणगाडे खरेदीवर आहे. जे भारतीय सैन्यात आधीपासूनच तैनात आहेत. पाकिस्तानचीही रशियाबरोबर मोठा संरक्षण करार करण्याची इच्छा आहे. स्वातंत्र्यानंतर रशिया हा भारताचा सर्वात मोठा आणि विश्वसनीय संरक्षण भागीदार राहिला आहे. अशातच पाकिस्तान रशियाबरोबर वाढवत असलेली जवळीक ही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. पाकिस्तान 2025पर्यंत संरक्षण ताफ्याला मजबूत करण्याच्या तयारीत आहे.ज्याअंतर्गत पाकिस्तान 360 टँक विकत घेणार आहे. तर चीनच्या मदतीनं 220 रणगाडे स्वदेशीच बनवण्याची पाकिस्तानची योजना आहे. गेल्या वर्षभरापासून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात तणाव वाढत चालला आहे. त्याच वेळी पाकिस्तान स्वतःचं सैन्य सामर्थ्य वाढवत असल्यानं भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. पाकिस्तानकडून नेहमीच सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतो.
600 रणगाडे पाकिस्तान नियंत्रण रेषेवर करणार तैनात, भारताच्या डोकेदुखीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 9:05 PM