राफाह (गाझापट्टी) : इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे दक्षिण गाझा पट्टीतील उच्च-सुरक्षा असलेल्या अपार्टमेंटवर हल्ला करत दोन ओलिसांची सुटका केली आणि एका नाट्यमय घटनेत गोळीबार होत असतानाही त्यांना बाहेर काढले.
हमासने ओलिस ठेवलेल्या १०० हून अधिक लोकांना मायदेशी परत आणण्यात इस्रायलसाठी हे छोटे पण महत्त्वाचे यश आहे. लष्कराने सुटका केलेल्या ओलिसांची ओळख ६० वर्षीय फर्नांडो सायमन मार्मन आणि लुईस हर अशी आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्याकडे अर्जेंटिनाचे नागरिकत्व देखील आहे.
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या काळात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान ६७ पॅलेस्टिनी ठार तर २०० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले. हे ऑपरेशन दक्षिण गाझा शहर रफाह येथे केले गेले. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, सतत लष्करी दबावामुळे ओलिसांची सुटका होईल. इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुद्द्याला विरोध केला असला तरी त्यांनी सोमवारी याच मुद्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. इस्रायलने गाझातील शहरे बेचिराख केली आहेत.
आता लोकांवर हल्ले?इस्रायलने गाझामधील हमासचा शेवटचा उरलेला गड म्हणून रफाहचे वर्णन केले आहे. लवकरच दाट लोकवस्तीच्या शहराला लक्ष्य केले जाईल असे संकेत दिले आहेत.
अमेरिकेचा इशारा...अमेरिकेने रविवारी सांगितले की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांना इशारा दिला होता की इस्रायलने नागरिकांच्या संरक्षणासाठी ‘विश्वसनीय आणि योग्य’ योजनेशिवाय रफाहमध्ये हमासविरूद्ध लष्करी कारवाई करू नये.