ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 7 - उरी हल्ल्यानंतर भारताने केलेला सर्जिंकल स्ट्राईक यामुळे भारत - पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे पाकिस्तान सरकार चर्चा करण्याऐवजी रोज शस्त्रसंधी उल्लंघन करुन चर्चेमध्ये अडथळे आणत असताना पाकिस्तानी नागरिकांना मात्र भारतासोबत चर्चा व्हावी असं वाटत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार 68 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी भारताशी चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
68 टक्के पाकिस्तानी नागरिक भारताशी चर्चा व्हावी या मताचे असून यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. गिलानी रिसर्च फाऊंडेशनने हा सर्व्हे केला आहे.
या सर्व्हेमध्ये 1835 लोक सहभागी झाले होते. यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होता. देशातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. पंजाब, सिंध, बलुचिस्तान प्रांतामध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारण्यात आला की, भारताशी चर्चा होण्याच्या बाजूने आहात की विरोधात ?
26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 31 टक्के लोकांनी चर्चेला विरोध केला होता, तर एक टक्का लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला.