अंकारा : तुर्कस्तानच्या पूर्वेकडील प्रांतामध्ये रात्री आठच्या सुमारास 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र हादरा बसला. यामध्ये 10 पेक्षा जास्त इमारती कोसळल्या असून 18 जण ठार झाले आहेत. तर 500 हून अधिक लोक जखमी आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
तुर्कस्तानचे गृह मंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, भूकंपाचे केंद्र पूर्वेकडील एलाजिग प्रांतातील सिवरिस येथील आहे. भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये 30 जण दबले गेले आहेत.
स्थानिक वेळेनुसार भूकंप रात्री 8 च्या सुमारास झाला. सिवरिस शहराच्या 10 किमी क्षेत्रामध्ये तीव्र धक्के जाणवले. 40-40 सेकंदांच्या अंतराने तब्बल 60 धक्के जाणवले. यामुळे लोक घाबरून बाहेर पडले. सरकारने लगेचच मदत सुरू केली असून भूकंपानंतर पुन्हा आफ्टरशॉकचे धक्के जाणवण्याच्या भीतीने लोकांना पडझड झालेल्या इमारतींकडे जाण्यापासून रोखण्यात आले आहे.
भूकंपाचे झटके शेजारील देश इराण, सिरिया आणि लेबनॉनमध्येही जाणवले आहेत. तुर्कस्तानमध्ये 1999 मध्ये खतरनाक भूकंपा झाला होता. यामध्ये 18 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर 10 वर्षांपूर्वी एलाजिगमध्ये झालेल्या भूकंपात 51 जण ठार झाले होते.