काठमांडू : नेपाळच्या सिंगजा येथील एका शाळेत १२-१३ वर्षांच्या मुलांसोबत पांढरी दाढी असलेले ६८ वर्षीय आजोबादेखील शाळेचा गणवेश परिधान करून मनोभावे शिक्षण घेत आहेत. हाती काठी घेऊन शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या या आजोबांना मुले ‘बाबा’ म्हणून हाक मारतात, त्यांच्यासोबत खेळतात आणि शाळेला सुट्टी झाल्यावर दप्तर घेऊन त्यांच्यासोबतच गप्पागोष्टी करीत आपापल्या घरी परततात.काठमांडूपासून २५० कि.मी. अंतरावरील सिंगजा या लहानशा गावात राहणारे दुर्गा कामी गरिबीमुळे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. जीवनातील धावपळ, कुटुंबाचे पोट भरण्यासाठी चालविलेली धडपड आणि आर्थिक चणचण, यामुळे शिक्षण घेता आले नाही. शिकण्याची जिद्द आणि स्वप्न मात्र जिवंत राहिले. अशातच सहा अपत्ये झाली आणि आठ नातवंडेही अंगणात खेळू लागली, पण पत्नीचा मृत्यू झाला आणि जीवनात रितेपणा आला. मग अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा झाली.दुर्गा यांची शिकण्याची तीव्र इच्छा लक्षात घेऊन, कला भैरव उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक डी. आर. कोईराला यांनी पुढाकार घेतला. त्यांना केवळ शाळेत दाखलाच दिला नाही, तर पाठ्यपुस्तके, गणवेशही दिला. (व्हीएनआय)‘शाळेत येतो, तेव्हा कसलेही भय वा कमीपणा वाटत नाही. निर्भयपणे शाळेत येऊन केवळ अभ्यास करू इच्छितो. येथे आल्यावर कसलीही चिंता आणि काळजी राहात नाही, मन प्रसन्न राहते. शेवटच्या श्वासापर्यंत शिकतच राहावे, असे वाटते.’
६८ वर्षांचे आजोबा चालले शाळेला!
By admin | Published: June 21, 2016 7:26 AM