पंतप्रधान युद्धभूमीत ७ तास; रशिया-युक्रेन वादावर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:16 AM2024-08-22T06:16:41+5:302024-08-22T06:31:44+5:30
मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी पोलंडला पोहोचले असून, पंतप्रधान मोदी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत तेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले.
वाॅर्सा/नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन युद्धात तणाव वाढला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर गेले आहेत. युक्रेन वादावर राष्ट्राध्यक्ष वालोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी भारताच्या दृष्टिकोनावर चर्चा करणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी बुधवारी सांगितले.
मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी पोलंडला पोहोचले असून, पंतप्रधान मोदी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत तेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी मुलांशी हस्तांदोलनही केले. मोदींच्या स्वागतासाठी दांडिया नृत्य सादरीकरण करण्यात आले.
पंतप्रधान आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात २१ आणि २२ ऑगस्ट रोजी पोलंडची राजधानी वॉर्साला भेट देणार आहेत. २३ ऑगस्ट रोजी मोदी युक्रेनची राजधानी कीवमध्ये तब्बल ७ तास असतील. युद्धग्रस्त युक्रेन १९९१ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा या देशाचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान मोदींची पोलंड भेट गेल्या ४५ वर्षांतील
भारतीय पंतप्रधानांची पोलंडची पहिली भेट आहे.
विशेष रेल्वेने तब्बल १० तासांचा प्रवास
पंतप्रधान मोदी पोलंडहून युक्रेनची राजधानी कीव येथे ‘रेल फोर्स वन’ या विशेष रेल्वेने तब्बल १० तासांचा प्रवास करून पाेहोचतील आणि याच रेल्वेने पोलंडमध्ये परततील. वॉर्सा येथून मोदी कीव येथे पोहोचणार असून, १९९१ नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांची युक्रेनची ही पहिली भेट असेल.
मॉस्कोवर युक्रेनचा सर्वांत मोठा ड्रोनहल्ला
२०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने बुधवारी रशियावर सर्वांत मोठा ड्रोनहल्ला केला आहे. रशियाने मात्र हे सर्व ४५ ड्रोन यशस्वीरीत्या पाडल्याचा दावा केला आहे.
राजधानी मॉस्कोभोवती बांधलेल्या मजबूत संरक्षण यंत्रणेमुळे सर्व ड्रोन नष्ट करण्यात आले. युक्रेनने युद्धातील रशियाची क्षमता कमकुवत करण्याच्या प्रयत्नात अनेक तेल रिफायनरी आणि एअरफील्डला लक्ष्य केले आहे.
युक्रेनचे सैन्य रशियाच्या पश्चिम कुर्स्क भागात घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच हा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. सध्या युक्रेनची ताकद वाढली असून, युक्रेनच्या वाढत्या चढाईमुळे रशिया सध्या पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
nमात्र रशिया लवकरच मोठी कारवाई करेल, अशी भीती तज्ज्ञांना वाटते आहे.
भारत-पोलंड व्यापारात १० वर्षांत १९२% वाढ; भारतीय कंपन्यांकडून रोजगारही
२०२३ मध्ये भारत आणि पोलंडमध्ये ५.७२ अब्ज डॉलर्स (सुमारे ४८ हजार कोटी रुपये) व्यापार झाला आहे.
२०१३ ते २०२३ पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार १९२% वाढला आहे. पोलंडमध्ये भारताची ३ अब्ज डॉलर (२५ हजार १७८ कोटी) पेक्षा जास्त गुंतवणूक आहे.
भारतीय आयटी कंपन्या पोलंडमध्ये सुमारे १० हजार लोकांना रोजगार देतात. त्याच वेळी, पोलंडची भारतात ५ हजार ७४९ कोटी गुंतवणूक आहे. भारत पोलंडशी प्रामुख्याने संरक्षण शस्त्रांसंबंधी व्यापार करतो.