ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 02 - दहशतवाही संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरियाच्या (आयएस) हँकर्सनी अमेरिकेच्या 70 लष्करी जवानांची हिट लिस्ट जारी केली आहे. या हिट लिस्टमध्ये सिरियावर ड्रोन हल्ला करणा-या जवानांचा समावेश आहे. आयएसने या जवानांची हत्या करण्याचे आदेश दिले आहेत.
संडे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हँकर्सचा ब्रिटनशी संबंध आहे. त्यांनी स्वत:ला 'इस्लामिक स्टेट हँकींग डिव्हिजन' असं नाव दिलं आहे. अमेरिकेच्या 70 लष्करी जवानांची नावे, फोटो आणि पत्ते ऑनलाइनच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत. यामध्ये महिलांचादेखील समावेश आहे. तसंच आपल्या समर्थकांना 'हे जिथे कुठे असतील तिथे त्यांची हत्या करा, त्यांचं मुंडकं छाटा, गोळ्या घाला नाहीतर बॉम्बने उडवून द्या' असा संदेश आयएसने दिला आहे.
ब्रिटनच्या मंत्रालयाला भेदल्याचा दावाही आयएसच्या या गटाने केला आहे. तसंच 'ब्रिटन रॉयल एअर फोर्स' ड्रोन ऑपरेटरशी संबंधित गुप्त माहिती उघड करण्याची धमकीदेखील दिली आहे. या हिटलिस्टमध्ये आयएसचा झेंडा वापरण्यात आला आहे. ज्याच्याखाली 'लक्ष्य - अमेरिकन लष्कर' असं लिहिण्यात आलं आहे. ट्विटर आणि जस्टपेजच्या वेबसाईटवरुन ही कागदपत्र प्रसारित करण्यात आली आहेत.
'पुढच्यावेळी आम्ही तुमची गुप्त माहिती उघड करु. आयएसला ब्रिटनमधील त्यांच्या लोकांकडून ही माहिती उपलब्ध झाली आहे. सुरक्षामंत्रालयाच्या माध्यमातून आमच्या भावंडांनी ही माहिती मिळवली आहे. आम्ही इंग्लंड आणि अमेरिकेत धीम्या गतीने घुसखोरी करत आहोत', असं आयएसने म्हटलं आहे. यावेळी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा मुंडकं नसलेला फोटोही छापण्यात आला आहे.
याअगोदर आयसीसच्या हँकींग विभागाची जबाबदारी ब्रिटिश मुस्लिम जुनैद हुसेन याच्याकडे होती. अमेरिकेने ऑगस्टमध्ये सिरियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्याची पत्नी सॅली जोन्स अजूनही आयएसशी संलग्न असल्याची शंका आहे.