ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. २४ - मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौदी अरेबियातील मक्का मशिदीजवळ हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन ७१७ भाविक मृत्यूमुखी पडले असून ५०० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. मक्का शहराबाहेर सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या मीना येथे ही दुर्घटना घडली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान मृतांमध्ये कोणी भारतीय भाविक होते का याबद्दल अद्याप माहिती समजू शकलेले नाही. यंदा भारतातून १ लाख ३६ हजार भाविक हज यात्रेसाठी गेले आहेत.
यावर्षी हज यात्रेत जगभरातून सुमारे २० लाख भाविक सहभागी झाले होते. आज तेथे बकरी ईद साजरी होत असून या दिवशी मक्केतील मुख्य मशिदीबाहेर मीना येथे सैतानाला दगड मारण्याची जुनी पंरपरा आहे. दुष्ट प्रवृत्तींचा विनाश व्हावा अशी त्यामागची संकल्पना असून त्यात सात वेळा दगड मारला जातो. आज या विधीसाठी सुमारे १५ लाख भाविक मशिदीजवळ जमले होते. दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती, मात्र अचानक धावाधाव झाल्याने भीषण चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांना प्राण गमवावे लागले. दरम्यान हे वृत्त कळताच मदत व बचाव पथकाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुूरू केले. अनेक जवान व शेकडो अँब्युलन्स तेथे दाखल झाल्या असून जखमींवर उपचार केले जात आहेत तर गंभीर जखमींना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे समजते. .
अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच मक्का येथील ग्रँड मशिदीत क्रेन कोसळून १०७ जण मृत्यूमुखी पडले होते. काही दिवसांतच पुन्हा अशी दुर्घटना घडल्याने जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान भारतीय परराष्ट्रखात्याने सौदीमधल्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत असल्याचे आणि अद्याप तरी भारतीय नागरीक दुर्घटनेत आढळल्याचे वृत्त नसल्याचे सांगितले. सौदीमधल्या विविध रुग्णालयांमध्ये भारतीय डॉक्टर्स तैनात असल्याची माहितीही परराष्ट्र खात्याने दिली आहे.