हरारे- 37 वर्षे झिम्बाब्वेच्या सत्तेमध्ये राहिल्यानंतर रॉबर्ट मुगाबे यांच्याजागी आता नवा नेता येण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेमधील सध्याच्या राजकीय हालचालींकडे पाहात मुगाबे यांनी पदच्युत केलेल्या उपाध्यक्ष इमर्सन म्नान्गग्वा यांच्याकडे सत्ता येण्याची सर्वाधीक शक्यता आहे. इमर्सन हे झिम्बाब्वेमध्ये क्रोकोडाईल नावाने ओळखले जातात.
इमर्सन म्नान्गग्वा हे गेली अनेक दशके मुगाबे यांना राजकीय क्षेत्रात मदत करण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या अधिकारांमुळे ते शक्तीशाली झाले. अत्यंत कठोर नेता म्हणूनही ते ओळखले जातात. मुगाबे यांनी घेतलेले निर्णय कठोरपणे राबवण्यासाठीच त्यांनी या शक्तीचा वापर केला. जनतेमध्ये लोकप्रियता मिळवण्यापेक्षा सुरक्षा दले आणि सैन्यामध्ये त्यांनी स्वतःचे पाठिराखे तयार केले. त्याचाच उपयोग त्यांना या लष्करी बंडाच्या वेळेस होत आहे.
1980 साली झिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यावर त्यांच्याकडे मिनिस्टर ऑफ सिक्युरीटी अशी जबाबदारी सोपवण्यात आली. मुगाबे यांच्या क्रांतीकारक फौजा, विरोधी नेते जोशुआ न्कोमो यांच्या फौजा आणि जुने रोडेशेयिन सैन्य एकत्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1983मध्ये मुगाबे यांनी न्कोमो यांच्या पाठिराख्यांविरोधा मोहीम काढली याला मताबेलेलॅंड हत्याकांड असे ओळखले जातात. त्यामध्ये 10,000 ते 20,000 लोक मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. हे घडवून आणण्यासाठी सैन्याच्या तुकडीला उत्तर कोरियाकडून प्रशिक्षण देण्याचे काम इमर्सन यांनी केले असा आरोप त्यांच्यावर केला जातो.
गेली अनेक वर्षे इमर्सन यांनी स्वतःची अनुभवी नेता अशी प्रतिमा निर्माण केली आणि आपण देशाला स्थैर्य देऊ शकतो असा समज पद्धतशीरपणे पसरवण्यास सुरुवात केली. मुगाबे आणि इमर्सन यांच्यामध्ये तसा कोणताच फरक नाही. वयाची 92 वर्षे पूर्ण होऊनही मुगाबेंना सत्ता सोडाविशी वाटत नव्हती, त्यासाठीच त्यांनी पत्नी ग्रेसला सत्ता सोपविण्याची हालचाल सुरु केली होती. इमर्सनसुद्धा 75 वर्षांचे आहेत. सत्तांतर झाले तरी नेतृत्त्वाच्या मानसिकतेत फारसा बदल दिसून येणार नाही असे तज्ज्ञांना वाटते.