येमेन : येमेनची राजधानी साना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 300 हून जण गंभीर जखमी झाले आहे. हुथी बंडखोरांच्या अधिकृत माध्यमांनी गुरुवारी ही माहिती दिली.
येमेनमधील इराण-समर्थित हुथी चळवळीद्वारे चालवल्या जाणार्या मुख्य टेलिव्हिजन न्यूज आउटलेट अल मसिराह टीव्हीने साना येथील आरोग्य संचालकांचा हवाला देऊन सांगितले की, मृतांव्यतिरिक्त अनेक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. हुथी-नियंत्रित अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत व्यापाऱ्यांद्वारे आर्थिक मदत करताना चेंगराचेंगरी झाली.
वृत्तसंस्था रॉयटर्सने बचाव कार्यात सहभागी असलेल्या दोन प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, ही आर्थिक मदत करण्यासाठी एका शाळेत शेकडो लोक जमले होते. येथे प्रत्येक व्यक्तीला 5,000 येमेनी रियाल किंवा भारतीय चलनात सुमारे 1500 रुपये मिळणार होते. दरम्यान, या घटनेनंतर ज्या शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ती शाळा तात्काळ बंद करण्यात आली आहे. पत्रकारांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
याचबरोबर, या कार्यक्रमासाठी गर्दी प्रचंड झाली होती. त्यामुळे जमावाला नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र हुती बंडखोरांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळी गोळी एका विजेच्या तारेला लागली. त्यामुळे स्फोट झाला. या घटनेमुळे लोक घाबरले. त्यांच्यात दहशत निर्माण झाली आणि एकच पळापळ सुरू झाली. त्यामुळे ही घटना घडल्याचे, प्रत्यक्षदर्शी अब्देल रहमान अहमद यांनी सांगितले.