सेओल - दक्षिण कोरियामध्ये एका पादरीला बलात्कार प्रकरणात 15 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या पादरीने आठ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे देवाचा आदेश असल्याचे सांगत हा 75 वर्षीय आरोपी ली-जे रॉक आपल्या चर्चमधील महिलांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचेही हा पादरी या महिलांना सांगत असे.
दक्षिण कोरियातील मेगाचर्चमधील या पादरीने 8 महिलांचे लैंगिक शोषण केले होते. विशेष म्हणजे या पादरीच्या मेगाचर्चला कुठल्याही ईसाई संस्थानाकडून मान्यता नाही. सन 1982 मध्ये 12 अनुयायांना सोबत घेऊन या पादरीने चर्चची स्थापना केली होती. मात्र, हे चर्च सध्या मेगाचर्च बनले असून जगभरात याच्या 10 हजार संस्था आहेत. दरम्यान, महिलांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर, कोर्टाने पादरी ली-जे रॉक यास 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. हा पादरी दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलांचे शोषण करत होता. तर, आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल, या आशेने महिला त्याचे ऐकत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. तसेच या महिला लहानपणापासून त्या चर्चमध्ये जात होत्या, त्याचाच फायदा या पादरीने घेतल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.