न्यू यॉर्क, दि. १ - एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉमचा मालका झालेल्या सन्मय वेदला गुगलने तब्बल आठ लाख रुपये दिले आहेत. सप्टेंबरमध्ये गुजरातमधल्या सन्मय वेद या तरूणाला गुगलची डोमेन बघता बघता असं आढळलं की google.com हे डोमेन विक्रीसाठी उपलब्ध आहे. गुगलचाच माजी कर्मचारी असलेल्या सन्मयने ते चक्क अवघ्या १२ डॉलर्सना खरेदी केलं. गुगलने हा खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करेपर्यंत त्याला गुगलच्या वेबमास्टर टूलचा ताबाही मिळाला. अखेर, सन्मयने ते डोमेन गुगलला सुमारे चार लाख रुपयांना परत केले. परंतु हा किस्सा इथं संपला नाही.
सन्मयने त्याला मिळालेले चार लाख रुपये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कामासाठी दान केले. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था देशभरात सुमारे ४०४ मोफत शिक्षण देणा-या शाळा चालवते आणि जवळपास ३९,२०० मुलं तिथं शिकतात. सन्मयने या संस्थेला हे पैसे दिल्याचे कळताच, गुगलने स्वत:हून ही रक्कम दुप्पट करत सन्मयला आठ लाख रुपये दिले आहेत.
गुगलची सुरक्षा किती अभेद्य आहे हे बघण्यासाठी जगभरातल्या तंत्रज्ञांसाठी गुगल सेक्युरिटी रिवॉर्ड प्रोग्राम राबवते. यामध्ये सहभागी झालेल्या व गुगलच्या यंत्रणेतल्या त्रुटी दाखवलेल्या जवळपास ३०० तरुणांना गुगलने गेल्या वर्षी दोन दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. २०१० मध्ये ही संकल्पना त्यांनी राबवण्यास सुरुवात केली आणि आत्तापर्यंत सहा दशलक्ष डॉलर्स बक्षीसापोटी दिले आहेत.