ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 3 - अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे बुधवारी सकाळी अमेरिकन दुतावासाजवळ आत्मघातकी हल्ला करण्यात आला. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, एका सुसाइड बॉम्बरने नाटोच्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "नाटोच्या ताफ्यातील सैनिकांसाठी साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला काबूलमधील वर्दळीच्या ठिकाणी झाला आहे". त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
तालिबाननं दिली होती धमकी
या हल्ल्याचा संबंध तालिबानकडून मिळालेल्या धमकीसोबत जोडण्यात येत आहे. परदेशी सैनिकांना टार्गेट करण्यात येईल, अशी धमकी तालिबाननं दिली होती. त्यामुळे तालिबानचा या हल्ल्यात हात आहे का?, या दिशेनं तपास सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वी तालिबाननं 21 एप्रिल रोजी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील शहर मजार-ए-शरीफ जवळील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात 140 सैनिकांचा मृत्यू झाला. सैन्य तळावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. दहा हल्लेखोर सैनिकांच्या वेशात आले होते.
हल्लेखोर लष्करी तळाच्या प्रवेशद्वारावर आले. तेव्हा त्यांनी गाडीत जखमी सैनिक आहेत, असे सांगून आतमध्ये जाण्याची घाई केली. आत प्रवेश करताच त्यांनी रॉकेटसह ग्रेनेड व स्वयंचलित रायफलींनी सैनिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवळच्या मशिदीत काही सैनिक नमाज अदा करत होते. काही सैनिक रात्री भोजन करत होते. त्यावेळी हा हल्ला झाला. या तळावर अमेरिकेसह अनेक देशांचे सैनिकही होते.
लष्कर, पोलीस दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
मार्चमध्येही दहशतवाद्यांनी लष्कराला लक्ष्य केले होते. काबूलमधील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयावर हल्ला करण्यात आला होता. त्यात डझनावर लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर डिसेंबर 2014 पासून असे हल्ले सुरू आहेत. विविध हल्ल्यात सैनिक व पोलीस मिळून 6 हजार 800 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
Civilian casualties, as suicide bomber targeted NATO convoy near US embassy in Kabul city: Afghanistan media— ANI (@ANI_news) May 3, 2017