ऑनलाइन लोकमत
शिकागो, दि. ३१ - जगातील सर्व पक्ष्यांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त म्हणजे ८३ वर्षे जगणा-या काकाकुवा या पक्ष्याचा सोमवारी मृत्यू झाला. जगातील सर्वात वयस्कर पक्षी म्हणून काकाकुवा पक्ष्याकडे पाहिजे जात होते.
शिकागो येथील प्रसिद्ध असलेल्या ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयात सोमवारी काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयात काककुवा पक्ष्याला कुकी या नावाने सर्वजण ओळखत होते. लाल व पिवळा तुरा असलेला सफेद गुलाबी रंगाचा कूकी हा अवघ्या एक वर्षाचा असताना ऑस्ट्रेलियातील तारोंगा प्राणिसंग्रहालयातून आणले होते, अशी माहिती ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयाच्या अधिका-यांनी दिली.
गेल्या शनिवारी कुकीची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. कुकीला वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यात ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि मोतीबिंदू झाल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले.
काकाकुवा पक्ष्याबद्दल माहिती...
काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे. या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे. मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बर्याच बेटांवर हा पक्षी आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियात याच्या अकरा जाती आहेत. त्यापैकी पिवळसर तुरा असलेले पांढर्या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात.