ऑनलाइन लोकमत
नाईस, दि. १५ - फ्रान्समधील नीस शहरात राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांना एका इसमाने ट्रकने चिरडल्याने ८४ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. नीस शहरात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून हा एक दहशतवादी हल्लाच असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेतील गंभीर जखमींची संख्या वाढतच चालली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान निरपराध नागरिकांना चिरडणा-या त्या माथेफिरूला कंठस्नान घालण्यात फ्रान्स पोलिसांना यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीस शहरातील फ्रेंच रिव्हेरा रिसॉर्टमध्ये काही नागरिक राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले असतानाच अचानक एका ट्रक चालकाने उपस्थितांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये ८० हून अधिक ठार झाले. दरम्यान त्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा असल्याचे उघड झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिका-यांनी घटनास्थऴी धाव घेतली तसेच रुग्णवाहिकाही तेथे तातडीने पोचल्या.
फ्रान्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा एक पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वेबसाईटनुसार दहशतवाद्याने जमावावर ट्रक घातला व त्यांच्यावर गोळीबारही केला. अवघ्या काही वेळातच तेथे मृतदेहांचा खच पडला. दरम्यान इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे.
सुरक्षा अधिका-यांनी लोकांना घरातून निघण्यास मनाई केली आहे. फ्रान्सच्या स्थानिक वाहिनीच्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला असू शकतो. कारण अचानक गर्दीत ट्रक शिरुन एवढे लोक ठार होत नाहीत. ट्रकमध्ये स्फोटके आढळल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक पुढील तपास करत आहे.
दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांनी या घटनेनंतर तत्काळ बैठक बोलावली असून हा ट्रक दहशतवादी हल्लाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच फ्रान्समध्ये आणखी तीन महिन्यांसाठी आणीबाणी वाढवली जाणार असल्याचेही ओलांद यांनी स्प्ष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातील महत्वपूर्ण नेत्यांनी या हल्ल्याची निंदा केली असून मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच अमेरिका फ्रान्सला शक्य तितकी मदत करेल, असेही ओबामांनी स्पष्ट केले.
दरम्यान या हल्ल्यात कोणत्याही भारतीयाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती परराष्ट्र खात्यातर्फे देण्यात आली आहे. तसेच फ्रान्समधील भारतीय दूतावासातील हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला असून तो +३३-१-४०५०७०७० असा आहे.
#BREAKING: Nice truck attack death toll rises to 77: mayor— AFP news agency (@AFP) July 15, 2016
Appalled by the horrific attack in Nice. I strongly condemn such mindless acts of violence. My thoughts are with the families of deceased.— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2016
I hope the injured recover soon. India shares the pain & stands firmly with our French sisters & brothers in this hour of immense sadness.— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2016
India stands shoulder to shoulder with the people and Government of France as it responds to #NiceAttack: President Pranab Mukherjee— ANI (@ANI_news) July 15, 2016