काठमांडू : एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर सर करणारा जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असा विक्रम पुन्हा स्वत:च्या नावे नोंदविण्याच्या इराद्याने आलेल्या मिन बहादूर शेरचेन या ८५ वर्षांच्या नेपाळी गिर्यारोहकाचा ही चढाई करत असताना बेसकॅम्पवरच मृत्यू झाला.१७ नातवंडांचा आजोबा व सहा पणतवंडांचा पणजोबा असलेल्या मिन बहादूर यांनी मे २००८ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी एव्हरेस्टवर सर केले तेव्हा ही कामगिरी करणारे ते त्यावेळी जगातील सर्वात वयोवृद्ध गिर्यारोहक ठरले होते. परंतु सन २०१३ मध्ये युईचिरो मियुरा या जपानी गिर्यारोहकाने वयाच्या ८० व्या वर्षी एव्हरेस्टवर झेंडा रोवून हा विक्रम मोडला होता.मियुरा यांचा विक्रम मोडून तो पुन्हा आपल्या नावे लावण्याच्या इराद्याने मिन बहादूर यांनी कित्येक महिने आधी प्रशिक्षण सुरू केले होते. जन्मापासून पर्वतीय भागातच वास्तव्य केल्याने उंचीवर विरळ हवेमुळे होणारा श्वसनाचा त्रासही त्यांना कधी झाला नाही. पूर्ण तयारीनिशी ते बेसकॅम्पपर्यंत आले होते. पण बहुधा वार्धक्यामुळे हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता नेपाळ सरकारचे गिर्यारोहण अधिकारी ग्यानेंद्र श्रेष्ठ यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पुन्हा विक्रमाचे स्वप्न विरलेपुन्हा एकदा जागतिक विक्रम करून प्रसिद्धी मिळाली की जगातील संघर्षग्रस्त भागांमध्ये जाऊन शांततेचा संदेश देण्याचा आपला इरादा आहे, असे मिन बहादूर गेल्या महिन्यात म्हणाले होते. धौलागिरी शिखरावर चढाई करण्यासाठी सन १९६० मध्ये आलेल्या एका स्विस गिर्यारोहक तुकडीसोबत नेपाळ सरकारने ‘लियासन आॅफिसर’ म्हणून पाठविले तेव्हापासून मिन बहादूर यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. नंतर त्यांनी सफरचंदाची शेती केली. रस्ते व धरणांच्या बांधकांमांवर काम केले आणि शेवटी काठमांडूमध्ये हॉटेल काढून ते स्थायिक झाले होते.
८५ वर्षीय गिर्यारोहकाचा एव्हरेस्ट चढाईत मृत्यू
By admin | Published: May 08, 2017 1:29 AM