जगावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशिया आणि युरोपियन देश युक्रेनमध्ये वाढलेला तणाव यासाठी कारणीभूत ठरला आहे. रशियाने लाखोंच्या संख्येने युक्रेनच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव केली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच अमेरिकेने युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले असून जवळपास ८५०० सैनिक आणि युद्धनौकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे नाटोने आपल्या मित्रराष्ट्रांच्या युद्धनौका आणि सैन्य मोठ्या प्रमाणावर युरोपच्या सीमेवर तैनात करण्याचे आज जाहीर केले आहे. नाटोने रशियावर युद्ध लादण्यापासून परावृत्त करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू, सर्व प्रकारचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर आता युरोपच्या सीमेवर सैन्याचा फौजफाटा जमविण्यास सुरुवात केली आहे.
नाटोचे अमेरिका आणि युरोपमधील ३० देश सदस्य आहेत. यामध्ये फ्रान्स, बेल्जिअम, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, अमेरिका, तुर्कीसारखे देश आहेत. नाटोची स्थापना रशियाचा वाढता धोका पाहून करण्यात आली होती. यानुसार नाटोच्या कोणत्याही सदस्य देशावर हल्ला झाला तर तो नाटोवरील हल्ला मानला जाईल, आणि नाटोचे सैन्य या हल्लेखोर देशावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र असेल, असा करार यामध्ये करण्यात आला आहे.
नाटोने आपल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की ते बाल्टिक समुद्राच्या प्रदेशात आपल्या संरक्षणासाठी पूर्ण तयारी करत आहेत. यासाठी सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. मदतीसाठी, F-16 लढाऊ विमाने डेन्मार्कमधून बाल्टिक देश (रशियाच्या सीमेला लागून असलेला देश) लिथुआनियाला पाठवण्यात आली आहेत. याशिवाय नाटो करारांतर्गत स्पेन बल्गेरियाला लढाऊ विमानेही पाठवत आहे. फ्रान्सने बल्गेरियात आपले सैन्य पाठवण्याचे आधीच सांगितले आहे.