वॉशिंग्टन : कोरोना साथीमुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच कोरोना लसीच्या वितरणासह साथीचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरचे प्रोत्साहन पॅकेज देण्यात येईल, असे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
कोरोना साथीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल, असे आश्वासन बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. हे आश्वासन आता प्रत्यक्षात आणण्याची योजना त्यांनी तयार केली आहे. डेलावेअर येथून केलेल्या दूरचित्रवाणी संबोधनात बायडेन यांनी म्हटले की, ‘मानवी संकट गंभीर आहे. आपल्याकडे वेळच नाही. आपणांस आताच कारवाई करावी लागेल.’ मदत पॅकेजपैकी ४१५ अब्ज डॉलर कोविड-१९ साथीला प्रतिसाद देण्यासाठी असतील. १ लाख कोटी डॉलर थेट कुटुंबांना मदत देण्यासाठी, तर ४४० अब्ज डॉलर व्यवसाय व संकटातील समुदायांना मदत करण्यासाठी असतील. गरजू कुटुंबांना प्रत्येकी १,४०० डॉलरची थेट मदत केली जाईल. गेल्यावेळी देण्यात आलेल्या ६०० डॉलरच्या मदतीव्यतिरिक्त ही मदत असेल. साप्ताहिक बेकारी भत्ता ३०० डॉलरवरून ४०० डॉलर करण्यात येणार असून, त्याला आता सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल.
पॅकेजचा दुहेरी हेतूअर्थव्यवस्थेला चालना देतानाच कोरोना साथीचा मुकाबला करणे, असा दुहेरी हेतू या पॅकेजमागे आहे, असे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेत कोरोनाने ३,८५,००० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. पुढील बुधवारी राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होत असलेल्या ट्रम्प यांनी अमेरिकी नागरिकांना २ हजार डॉलरची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला काँग्रेस सभागृहातील अनेक रिपब्लिक सदस्यांनी आक्षेप घेतला होता.