कीव्ह: युक्रेनमधील बुका शहरामध्ये रशियाच्या दोन सैनिकांनी नऊ नागरिकांच्या केलेल्या हत्याकांडाचा मनाचा थरकाप उडविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आहे. या नागरिकांना एका इमारतीमध्ये नेऊन त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. रशियाच्या सैनिकांनी युद्धामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असून त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे.
बुका शहरातील नऊ नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्याचा भीषण प्रकार ४ मार्च रोजी घडला आहे. सुमारे ११ सेकंदाच्या या व्हिडिओत दिसते की, या नागरिकांना दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूला ठेवून तसेच कमरेत वाकून चालत एका इमारतीच्या आत जाण्याचा आदेश रशियाच्या दोन रायफलधारी सैनिकांनी दिला. काही वेळानंतर सीसीटीव्हीने चित्रित केलेल्या व्हिडिओ फितीत या नागरिकांचे मृतदेह दिसतात.
अशा पद्धतीने युक्रेनच्या अनेक निरपराध नागरिकांची रशियाच्या सैनिकांनी हत्या केल्याचा आरोप जेलेन्स्की सरकारने केला आहे. कीव्हचा परिसर, मारियुपोल, बुका आदी शहरांमध्ये रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या शेकडो निरपराध नागरिकांची हत्या केली असून, त्यांचे सामूहिक दफन केल्याचेही आरोप युक्रेन व पाश्चिमात्य देशांनी केले आहेत. त्या सामूहिक दफनभूमीची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रेही सोशल मीडियावर झळकली होती. या सर्व आरोपांचा रशियाने इन्कार केला होता.
सैनिकांच्या मुक्ततेसाठी मदत करा; वोलोदिमीर जेलेन्स्की यांचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन
मारियुपोलमधील स्टील प्रकल्पाच्या आडोशाने लढणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांपैकी शरण आलेल्यांना रशियाने आता युद्धकैदी बनविले आहे. आपल्या या सैनिकांची मुक्तता होण्याकरिता आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केले. गेल्या सोमवारपासून युक्रेनच्या सुमारे १७०० सैनिकांनी रशियासमोर शरणागती पत्करली आहे.
युक्रेनच्या रशियाला शरण आलेल्या शेकडो सैनिकांची माहिती रेड क्रॉस या संघटनेने गोळा केली आहे. युद्धकैद्यांना मानवतावादी पद्धतीने वागविण्याबाबत दुसऱ्या महायुद्धानंतर काही करार करण्यात आले. ते जिनिव्हा करार या नावाने ओळखले जातात. त्या करारातील तरतुदींप्रमाणे रशियाने युद्धकैदी केलेल्या युक्रेनच्या सैनिकांना वागविले पाहिजे, असे रेड क्राॅसने म्हटले आहे. यु्द्धकैद्यांचा कोणत्याही प्रकारचा छळ रशियाने करू नये, असे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने म्हटले आहे.
रशियाने बॉम्बहल्ले करून अझोवत्सल स्टील प्रकल्पाचे मोठे नुकसान केले आहे. युक्रेनचा हा बालेकिल्ला जिंकला की रशियाचा मारियुपोल शहरावर लवकरच संपूर्ण कब्जा होणार आहे.
रशिया युद्ध गुन्हेगारीचे खटले दाखल करणार?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, रशियाने युद्धकैदी बनविलेल्या युक्रेनच्या सैनिकांच्या मुक्ततेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी. या सर्व युद्धकैद्यांना आमच्या हवाली करा अशी मागणी युक्रेनने रशियाकडे केली आहे. मात्र या युद्धकैद्यांपैकी काही जणांवर युद्ध गुन्हेगारीचे खटले दाखल करण्याची धमकी रशियाने दिली आहे.
युक्रेनला अमेरिकेकडून ४० अब्ज डॉलरच्या मदतीचा प्रस्ताव
- युक्रेनला ४० अब्ज डॉलरची लष्करी, आर्थिक व अन्नधान्यविषयक मदत देण्याचा प्रस्ताव अमेरिकी सिनेटने आता अमेरिकी काँग्रेसकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
- हा प्रस्ताव अमेरिकी सिनेटने गुरुवारी संमत केला. त्याला डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षांनी पाठिंबा दिला. युक्रेनला मदत करण्याबद्दल दोन्ही पक्षांचे एकमत असल्याचे या घटनेतून दिसले.