जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत पण एक पेट्रोल पंप मालक असा आहे जो त्याच्या वतीने डिस्काऊंट देऊन पेट्रोल स्वस्तात विकताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या पेट्रोल पंप मालकाचा हेतू सध्या नफा मिळवण्याचा नसून लोकांना मदत करण्याचा आहे. जसविंदर सिंग (Jasvinder Singh) असं या पेट्रोल पंपाच्या मालकाचं नाव आहे. भारतीय वंशाचा जसविंदर अमेरिकेतील फिनिक्स शहरात राहतो. तो फिनिक्समधील इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रति गॅलन पेट्रोल जवळपास अर्धा डॉलर कमी दराने विकत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जसविंदरच्या शहरात एक लीटर पेट्रोलची किंमत 98 रुपये आहे. पण तो 89 रुपये प्रति लीटरने आता पेट्रोल विकत आहे. म्हणजेच 10 लीटर पेट्रोलवर 90 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. एनबीसी न्यूजनुसार, जसविंदर सिंग हे वॅलेरो फूड मार्टचा मालक आहे. गेल्या शुक्रवारपासून तो त्याच्या पेट्रोल पंपावर 5.19 डॉलर प्रति गॅलन विकत आहे, तर त्याच्या शहरातील पेट्रोलची सरासरी किंमत 5.68 डॉलरच्या आसपास आहे.
जसविंदरने दिलेल्या माहितीनुसार, "मानवतेखातर आणि आपल्या धर्माच्या मुल्यांचं पालन करण्यासाठी पेट्रोलची किंमत आपल्या स्तरावर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्याकडे काही असेल तर ते दुसऱ्यांसोबत शेअर करायला हवं. तसेच आम्ही आमच्या मुलांना तेच शिकवतो. तुमच्याकडे काही असेल तर ते इतर लोकांसोबत शेअर करा."
जसविंदर सिंह गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या फिनिक्समध्ये राहत आहे. त्याला तीन मुलं आहेत. तो दररोज पहाटे चार ते रात्रीपर्यंत काम करत असतो. या कामात त्याची पत्नी रमनदी कौर देखील मदत करते. पेट्रोल कमी किंमतीत विकण्यामुळे सिंगचं दररोज खूप नुकसान होत आहे. पण आता पैसे कमवण्याची वेळ नाही तर लोकांना मदत करण्याची वेळ आहे असं जसविंदर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.