रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. ५ हत्यारबंद हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये आतापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर १०० हून अधिक जण जखणी झाले आहेत. मॉस्कोच्या पश्चिमेला असलेल्या क्रोसक सिटी हॉलवर बंदुकधारी हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यादरम्यान, घटनास्थळावरून स्फोटांचेही आवाज येत होते. तसेच कॉन्सर्ट हॉलमधून आगीचे लोट उसळत असल्याचे दिसत होते.
दरम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची आणि जखमी व्यक्तींची संख्या सातत्याने वाढत आहे. घटनास्थळावरील काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये घटनास्थळावरील भीषण परिस्थिती दिसत आहे. या व्हिडीओंमध्ये हल्लेखोर बेछूट गोळीबार करताना दिसत आहेत. तर घाबरलेले नागरिक जीव मुठीत धरून पळताना दिसत आहेत.
आणखी एका व्हिडीओमध्ये गणवेश घातलेले तीन हल्लेखोर कॉन्सर्ट हॉलच्या लॉबीमध्ये असलेल्या लोकांवर अगदी जवळून गोळ्या झाडताना दिसत आहेत. दरम्यान, रशियन सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे.
रशियाचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी हा हल्ला म्हणजे भीषण आपत्ती असल्याचे म्हटले आहे. सध्या घटनास्थळी किमान ५० रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. हल्लेखोरांनी संगीताचा कार्यक्रम सुरू असताना स्वयंचलित हत्यारांच्या मदतीने गोळीबार केला. इमारतीत घुसताच त्यांनी गोळाबारास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी असलेल्या लोकांची पळापळ झाली.