कतारमध्ये आठ भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले असून पुढील प्रक्रियेला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले. "आम्हाला फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे आणि आम्ही सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत", असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. आठ महिन्यांपूर्वी भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यांत ही अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो असून सविस्तर निर्णयाची प्रतीक्षा आहे.
कतारच्या न्यायालयाने शिक्षा सुनावताच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, "आम्ही माजी जवानांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. तसेच सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू असून कतारच्या अधिकाऱ्यांकडे हा निर्णय मांडणार आहोत. सर्व वकिलांना कायदेशीर साहाय्य प्रदान करणे सुरू ठेवले जाईल."
भारतीय नौदलाच्या सर्व माजी अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. या आठ जणांमध्ये प्रतिष्ठित अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यांनी एकेकाळी मोठ्या भारतीय युद्धनौकांचे नेतृत्व केले होते. ते अलीकडच्या काळात दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी कार्यरत होते. ही एक खासगी कंपनी आहे, जी कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि संबंधित सेवा पुरवते.
भारतीय नौदलाच्या ८ माजी जवानांना मृत्यूदंड
दरम्यान, कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश अशी या आठ माजी नौसैनिकांची नावे आहेत. या सर्वांना हेरगिरीच्या आरोपाखाली चौकशीसाठी त्यांच्या स्थानिक निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. माहितीनुसार, या आठही माजी अधिकाऱ्यांचे जामीन अर्ज अनेकदा फेटाळण्यात आले आहेत. कतारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोठडीत वाढ केली होती. अशातच गुरुवारी कतारच्या न्यायालयाने आठही भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.