गाबाेराेने : बाेत्सवाना येथील एका खाणीतून तब्बल २,४९२ कॅरेटचा हिरा काढण्यात आला आहे. हा जगातील दुसरा सर्वात माेठा नैसर्गिक हिरा आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड काॅर्प या कंपनीने काराेवे येथील खाणीतून हा हिरा उत्खनन करुन काढला.
कंपनीने एका निवेदनातून याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, एक्स-रे तंत्रज्ञानाने हा हिरा शाेधण्यात आला आहे. गेल्या १०० वर्षांत आढळलेला हा सर्वात माेठा हिरा ठरला आहे. कंपनीने या हिऱ्याचा दर्जा आणि किमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. बाेत्सवाना हा जगातील दुसरा सर्वात माेठा हिरा उत्पादक देश आहे. अलिकडच्या काळातील सर्वच सर्वात माेठे हिरे याच देशात सापडले आहेत.
सर्वात मोठे हिरे- १,७५८ कॅरेटचा ‘सेवेलाे’ हा हिरा याच खाणीत २०१९मध्ये सापडला हाेता. ताे आतापर्यंतचा दुसरा सर्वात माेठा हिरा मानला गेला हाेता. फ्रान्सच्या लुईस वुईटन या कंपनीने ताे खरेदी केला हाेता.
- १,१११ कॅरेटचा ‘लेसेदी ला राेना’ हा हिरादेखील याच खाणीतून काढण्यात आला हाेता. एका ब्रिटीश सराफ व्यावसायिकाने ताे ५.३ काेटी डाॅलरला २०१७मध्ये खरेदी केला हाेता.
सर्वात माेठ्या हिऱ्याचे झाले तरी काय?- १९०५मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीतून ३,१०६ कॅरेटचा हिरा काढण्यात आला हाेता. त्या हिऱ्याचे नाव कलिनन असे हाेते. त्याचे अनेक तुकडे करण्यात आले हाेते. त्यांचे पैलू पाडून ते हिरे ब्रिटीश शाही दागिन्यांमध्ये लावण्यात आलेले आहेत.
काळ्या हिऱ्याचे आकर्षणब्राझीलमध्ये १८००च्या दशकात एक माेठा काळा हिरा सापडला हाेता. मात्र, ताे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सापडला हाेता आणि ताे एखाद्या उल्केचा भाग असावा, असे त्यावेळी म्हटले गेले हाेते.