ब्रिटनमधील लंडन येथून मागील महिन्यात बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह एका नदीत आढळून आला आहे. मितकुमार पटेल असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो सप्टेंबर महिन्यात उच्चशिक्षणासाठी लंडनला गेला होता. मात्र १७ नोव्हेंबरला तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी मितकुमारचा शोध सुरू केला होता. आता त्याचा मृतदेह एका नदीत आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मितकुमार पटेल याला शेफिल्ड हॉलम विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण आणि एका ठिकाणी नोकरीला सुरुवात करण्यासाठी शेफिल्ड येथे जायचं होतं. मात्र १७ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे लंडन शहरात गेला आणि रात्री उशिरा घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे तेथील नातेवाईक चिंतेत पडले. त्यांनी मितकुमार बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी पोलिसांना टेम्स नदीत मितकुमारचा मृतदेह आढळला आहे.
मृतदेह भारतात पाठवण्यासाठी निधी जमा करण्याचं आवाहन
मितकुमार पटेल याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी पार्थ पटेल नामक त्याच्या नातेवाईकाने गो फंडच्या माध्यमातून निधी जमा करण्याचं आवाहन केलं आहे. मागील आठवडाभरात ५ लाख रुपयांचा निधी जमादेखील झाला आहे.
"मितकुमार पटेल हा एका शेतकरी कुटुंबातील तरुण होता. उच्चशिक्षणासाठी तो लंडनला आला होता. त्याचा अचानक झालेला मृत्यू आम्हा सगळ्यांसाठी वेदनादायी आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी आणि त्याचा मृतदेह भारतात परत पाठवण्यासाठी निधी जमा करण्याचा निर्णय घेतला असून जमा झालेले सर्व पैसे मितकुमार याच्या कुटुंबाला ट्रान्सफर केले जातील," अशी माहिती पार्थ पटेल याच्याकडून देण्यात आली आहे.