न्यूयॉर्क : अमेरिकेतील टेनेसी राज्यात चार महिन्यांचे बाळ भयंकर वादळात आकाशात उडाले, मात्र झाडावर अडकल्याने ते वाचले. या बाळाच्या पालकांनी सांगितले की, वादळाने त्यांचे घर उद्ध्वस्त केले, पाळणा उडाला, मात्र देवाच्या कृपेने बाळ वाचले आहे.
वादळात पाळण्यात झोपी गेलेल्या बाळासह पाळणा आकाशात उडाला. यावेळी वडिलांनी पाळणा पकडण्यासाठी धाव घेतली, पण वादळामुळे पाळणा गोल फिरत उडून गेला. त्यावेळी जोरदार पाऊसही पडत होता.
बाळाच्या २२ वर्षीय आई मूरने सांगितले की, वादळाने घराचे छत कोसळले. यात मी अडकून पडले. मला श्वासही घेता येत नव्हता. वादळ गेल्यानंतर आम्ही बाळाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडलो. मुसळधार पावसात शोध घेत असताना त्यांना झाडावर अडकलेल्या पाळण्यात बाळ सापडले. ते जिवंत सापडल्याने आम्हाला मोठा आनंद झाला आहे. मुलांना आणि मूरला किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी मुलाच्या वडिलांचा खांदा आणि हात मोडला आहे.