सॅन फ्रान्सिस्को : खलिस्तानी समर्थकांच्या एका समुहाने २ जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग लावली. मात्र, सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन विभागाने तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने ८ जुलैपासून परदेशातील भारतीय दूतावासांना घेराव घालण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही खलिस्तानी समर्थकांनी शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, भारतीय दूतावासात आग लागल्याची घटना २ जुलैच्या रात्रीची आहे.
या घटनेची माहिती स्थानिक, राज्य आणि फेडरल अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. खलिस्तान समर्थकांनी रविवारी (स्थानिक वेळेनुसार) सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासात कथित तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा युनायटेड स्टेट्सने मंगळवारी 'तीव्र निषेध' केला, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे. दरम्यान, सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर पाच महिन्यांत झालेला हा दुसरा हल्ला आहे.