काठमांडू : नेपाळमध्ये एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याने एकच खळबळ माजली. बेपत्ता हेलिकॉप्टरमध्ये ५ परदेशी नागरिकांसह ६ जण होते. अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर सोलुखुंबूहून काठमांडूला जात होते आणि सकाळी १० वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. स्थानिक वेळेनुसार दहा वाजून बारा मिनिटांनी हेलिकॉप्टर निघाले होते.
नेपाळच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विट केले असून हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते, त्यापैकी पाच प्रवासी आणि एक कॅप्टन होता अशी माहिती दिली आहे. शोध आणि बचावासाठी काठमांडूहून अल्टिट्यूड एअर हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.
काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, बेपत्ता हेलिकॉप्टरचा सकाळी सव्वा दहा वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महाव्यवस्थापक प्रताप बाबू तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल साइन 9N-AMV असलेले हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर १५ मिनिटांनी संपर्काबाहेर गेले. खरं तर बेपत्ता हेलिकॉप्टरने सोलुखुंबूमधील सुर्की येथून सकाळी ९.४५ वाजता राजधानी काडमांडूकडे उड्डाण केले होते. कॅप्टन चेत गुरुंग यांनी चालवलेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.