घराबाहेर क्षणाक्षणाला स्फोट होत होते. युद्धाचे ढग दिवसेंदिवस आणखीच गडद होत चालले होते. सगळ्यांनाच आपल्या अस्तित्वाची, आपण जिवंत राहू की नाही, याची चिंता होती. तरीही त्या घरात नवीन बाळ येणार म्हणून सगळेच खूश होते. हे बाळ आपल्यासोबत सगळ्यांसाठीच खुशी घेऊन येईल, युद्ध संपेल आणि आपल्याला पुन्हा पूर्वीसारखं सर्वसामान्य जीवन जगता येईल अशी त्यांना आशा होती. बाळाच्या आगमनानंतर काय काय करायचं, त्याचं स्वागत कसं करायचं, याची चर्चा घरात सुरू होती. किमान त्यामुळे तरी आपलं दु:ख, वेदना कमी होतील असं त्यांना वाटत होतं.
या जगात नव्यानं पाऊल ठेवणाऱ्या बाळाच्या मोठ्या, पण वयानं लहानच असलेल्या बहिणीची; मलकची उत्सुकता तर अगदी शिगेला पोहोचली होती. तिला भाऊ येणार की बहीण, या चर्चेत तीही हमरीतुमरीवर येऊन सामील व्हायची आणि कोणी म्हटलंच, येणारं बाळ मुलगा असेल तर मलकचा फारच तीळपापड व्हायचा. मला लहान बहीणच येणार यावर ती पूर्णपणे ठाम होती. गाझा पट्टीतील राफा शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील ही घटना. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या गाझा पट्टीतील या भागात काय परिस्थिती असेल आणि लोक कसे जगत असतील याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही, इतकी बिकट अवस्था तेथे आहे. मलकची आई तीस आठवड्यांची गर्भवती होती. येणाऱ्या बाळाला युद्धाचे चटके बसू नयेत यासाठी आपल्या परीनं संपूर्ण घरच तयारी करत होतं. मलकनं तर आपल्या लहान बहिणीचं नावही आधीच फिक्स करून ठेवलं होतं. बाळाचं नाव त्याच्या जन्माआधीच तिनं ‘रुह’ असं ठरवून टाकलं होतं. रुह या शब्दाचा अर्थ आत्मा. तिच्या हट्टाखातर घरातल्यांनीही त्याला मान्यता देऊन टाकली होती.
आता फक्त बाळाच्या जन्माचा तेवढा अवकाश होता, बाळ तर जन्माला येणारच होतं; पण, इतर परिस्थिती कदाचित नियतीला मान्य नसावी. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात नेमकं हेच घर सापडलं. दोन घरातले मिळून तब्बल १९ जण या हल्ल्यात ठार झाले. त्यात अजून जन्माला येणाऱ्या रुहचे आई-वडील आणि रुहच्या जन्मासाठी आस लावून बसलेल्या मलकचाही समावेश होता! दुर्दैव म्हणजे या घटनेतील १९ मृतांमध्ये एकाच घरातील तब्बल १३ मुलं होती. अर्थातच हे कुटुंब रुह आणि मलक यांचं होतं. त्यांच्या कुटुंबातलं कोणी म्हणजे कोणीही वाचलं नाही.आश्चर्याची गोष्ट म्हणजे जन्माला येणारं बाळ मात्र या हल्ल्यातून वाचलं. बाळाची आई वारली; पण, मृत आईच्या बाळाला जिवंतपणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.
आजूबाजूला कुठेही जवळपास हॉस्पिटल नसताना, डॉक्टरांची उपलब्धता नसताना आणि मुख्य म्हणजे प्रत्येकालाच आपल्या जिवाची पडलेली असल्यामुळे मदतीलाही कोणी नव्हतं. पण, या बाळाचं नशीबच बलवत्तर होतं. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतरही अचानक काही जण अक्षरश: देवदूत बनून तिथे आले. उद्ध्वस्त इमारतीचा सांगाडा आणि मृतांच्या ढिगाऱ्यामधून त्यांनी नेमक्या वेळी मलकच्या मृत गर्भवती मातेला बाहेर काढलं. सबरीन अल-सकानी हे तिचं नाव. जेवढ्या लवकर तिला रुग्णालयात नेता येईल तितक्या लवकर तिला त्यांनी डॉक्टरांजवळ नेलं. डॉक्टरांनीही आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून मृत आईच्या पोटातून या बाळाला जिवंत बाहेर काढलं! मलकच्या म्हणण्यानुसार ती मुलगीच होती. या बाळाचं नावही आता ‘रुह’च ठेवण्यात आलं आहे. पण, दुर्दैव म्हणजे तिला ‘रुह’ म्हणून हाक मारण्यासाठी आसुसलेली तिची मोठी बहीण मलक, तिचे आई-वडील, काका-काकू, इतर कोणीही भावंडं आता हयात नाहीत!.. डॉक्टरांनीही तिची नोंद ‘अनाथ’ अशीच केली आहे.
इमरजन्ससी सेक्शन डिलेव्हरीद्वारा रुहचा जन्म झाला. जन्माच्या वेळी तिचं वजन केवळ १.४ किलो (३.०९ पाऊंड) होतं. डॉक्टरांनी तिला इनक्युबेटरमध्ये ठेवलं आहे. किमान महिनाभर तिला हॉस्पिटलमध्येच ठेवलं जाईल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाळाची प्रकृती आता सुधारते आहे आणि बाळाच्या प्राणाचा धोका आता पूर्णपणे मिटला आहे.
युद्धात महिला आणि मुलं लक्ष्यइस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३४ हजारपेक्षाही जास्त नागरिक ठार झाले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये जवळपास ७० टक्के महिला आणि मुलांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत तर एकाच वेळी जवळपास शंभर लोक ठार आणि त्यापेक्षा दुप्पट लोक गंभीर जखमी झाले आहेत. या युद्धामध्ये दोन्ही बाजूंपैकी कोणीही महिला आणि मुलांना लक्ष्य करू नये तसेच सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कृती करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. ते किती अंमलात आणलं जाईल याविषयी मात्र शंकाच आहे!