सिंगापूर :
एक भारतीय महिला व तिच्या मुलीने सिंगापूरमध्ये आइस्क्रीमच्या २६ हजार कांड्यांच्या साहाय्याने सहा मीटर लांब व सहा मीटर रुंदीच्या आकाराची अप्रतिम रांगोळी साकारली. त्यामध्ये प्रख्यात तमिळ कवींचे चित्रण करण्यात आले आहे. या दोघींनी इतकी आगळीवेगळी रांगोळी काढून केलेल्या विक्रमाची सिंगापूर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
सुधा रवी यांनी २०१६ साली सिंगापूरमध्ये ३२०० चौरस फूट आकाराची भव्य रांगोळी काढली होती. त्याची नोंद सिंगापूर बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली होती.
- पोंगल सणानिमित्त कलामंजिरी, लिटल इंडिया शॉपकीपर्स अँड हेरिटेज असोसिएशन (लिशा) या संस्थांनी लिटल इंडिया भागामध्ये गेल्या आठवड्यात आयोजिलेल्या सांस्कृतिक महोत्सवात सुधा रवी व त्यांची मुलगी रक्षिता यांनी आइस्क्रीमच्या हजारो कांड्यांनी साकारलेली रांगोळी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली होती. - ही रांगोळी काढण्याचे काम महिनाभर सुरू होते. त्यामध्ये प्रख्यात तमिळ कवी तिरुवल्लूवर, अववैय्यार, भारतीयार, भारतीदासन या कवींचे चित्रण केले आहे.
1. आइस्क्रीमच्या कांड्यांपासून साकारलेली रांगोळी खूप सुंदर होती, असे सिंगापूरमध्ये खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या रजनी अशोकन यांनी सांगितले.2. पोंगलनिमित्त तमिळी कवींच्या कविता व गाणी यांचा कार्यक्रम तसेच व्हायोलिन, तबलावादन तसेच नृत्य सादर करून कलाकारांनी लोकांना मंत्रमुग्ध केले.
तमिळी संस्कृतीच्या प्रसारासाठी काढली रांगोळी- सुधा रवी या रांगोळी साकारण्यात अतिशय तरबेज आहेत. तमिळ संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी अनेक रांगोळ्या याआधी चितारल्या आहेत. त्यांच्या रांगोळ्यांचे सिंगापूरमधील अन्य वंशाच्या नागरिकांनीही कौतुक केले आहे. - तमिळी संस्कृतीबद्दल सिंगापूरमधील युवा पिढीलाही अभिमान आहे. पोंगल सणानिमित्त सुधा रवी व त्यांची मुलगी रक्षिता यांनी आइस्क्रीमच्या कांड्यांच्या साहाय्याने साकारलेली रांगोळी त्याचीच साक्ष देते, असे सिंगापूरमधील तमिळ समाजातील एक मान्यवर वैरावन यांनी सांगितले.