दोन दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात एका बैठकीत वाद झाल्याचे समोर आले होते. या वादाची चर्चा जगभरात झाली होती. दरम्यान, आता हा वाद मिटल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही देशांमध्ये आता मोठा खनिज करार होणार आहे. आज मंगळवारी एक महत्त्वाचा खनिज करार होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या वादग्रस्त बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
युक्रेनला अमेरिकेचा दणका, मदत रोखल्याने कोंडी; झेलेन्स्की म्हणाले, ट्रम्प वाद ‘दुर्दैवी’
मंगळवारी सायंकाळी काँग्रेसला संबोधित करत असताना याची घोषणा ट्रम्प करणार आहेत. करारावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही आणि परिस्थिती बदलू शकते. व्हाईट हाऊसने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील वादग्रस्त बैठकीनंतर हा करार स्थगित करण्यात आला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की करारावर स्वाक्षरी करण्यासाठी वॉशिंग्टनला आले होते.
त्या बैठकीत ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांना फटकारले. अमेरिकेच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले पाहिजेत असे म्हटले. रशियाशी संघर्षाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सांगितले होते की, तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात.
युक्रेन करारावर स्वाक्षरी करण्यास तयार
मंगळवारी, झेलेन्स्की यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी माहिती दिली. युक्रेन करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहे. करारात काही बदल झाले आहेत की नाही हे स्पष्ट नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या करारात युक्रेनसाठी कोणत्याही स्पष्ट सुरक्षा हमींचा समावेश नव्हता, परंतु युक्रेनच्या नैसर्गिक संसाधनांमधून मिळणाऱ्या महसुलात अमेरिकेला प्रवेश मिळाला असता.