रशिया-युक्रेन युद्धात मोठा उलटफेर; युक्रेनी सैन्य ३० किमीपर्यंत आत घुसले, झेंडे रोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:27 PM2024-08-12T13:27:07+5:302024-08-12T13:27:47+5:30
रशियाच्या हल्ल्यात दोन दिवसांत कीव पडेल असे सांगितले जात असताना दोन वर्षे झाली तरी रशियन सैन्य कीवच्या सीमेवरही पोहोचू शकलेले नाहीत.
रशिया-युक्रेन युद्धात मोठा उलटफेर होताना दिसत आहे. रशियाचे भाडोत्री सैनिक देशभावनेने लढताना दिसत नसून युक्रेनी सैन्याने रशियाच्या सीमेत थेट ३० किमी घुसत युक्रेनी झेंडे फडकावले आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनी सैन्य पहिल्यांदाच रशियात घुसून हल्ले करत आहे.
रशियाच्या हल्ल्यात दोन दिवसांत कीव पडेल असे सांगितले जात असताना दोन वर्षे झाली तरी रशियन सैन्य कीवच्या सीमेवरही पोहोचू शकलेले नाहीत. अशातच अमेरिकेचे पाठबळ मिळालेल्या युक्रेनी सैन्याने रशियात घुसण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये हे युद्ध सुरु झाले होते. आता ते रशियावरच उलटू लागले आहे.
शुक्रवारी युक्रेनी सैन्य रशियाच्या सीमेत ३० किमी आतपर्यंत घुसले आहे. युक्रेनी सीमेला लागून असलेल्या कूर्स्कमध्ये युक्रेनी सैन्याने जवळपास २५० चौकिमी एवढा भूभाग ताब्यात घेतला आहे. युक्रेनी सैन्याचे पुढील लक्ष्य रशियन शहर सुद्जा आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून युक्रेनी सैन्य रशियाचे झेंडे इमारतींवरून हटवून आपले झेंडे लावताना दिसत आहेत.
रशियन सैन्य धडपडू लागले असून आधी ताब्यात घेतलेला युक्रेनी भूभाग गमावला व आता रशियन भूभागही गमविण्यास सुरुवात झाली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने टोलपिनो आणि ओब्शची कोलोडेड गावांमध्ये युक्रेनी सैन्यासोबत लढाई सुरु असल्याचे म्हटले आहे.
रशियाचा अणुउर्जा प्रकल्पही याच भागात आहे. रशियाने युक्रेनी सैन्य येत असल्याचे पाहून ८ ऑगस्टला या भागात आणीबाणी जाहीर केली होती. २४ तासांतच युक्रेनी सैन्याने कुर्स्क भागातील रशियन सैन्याची ताकद उध्वस्त केली आहे. युक्रेनियन सैन्याने 6 ऑगस्ट रोजी कुर्स्क भागात प्रवेश केला होता. रशियामधील युक्रेनियन सैनिकांची छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आल्यानंतरही युक्रेनियन अधिकारी रशियन सीमेत प्रवेश करण्याबाबत मौन बाळगून आहेत.