नवी दिल्ली - जगातील सर्वात प्रसिद्ध जहाज टायटॅनिकचे अवशेष दाखवणारी पाणबुडी टायटन समुद्राच्या खोल खोल पाण्यात रविवारी बेपत्ता झाली. पाणबुडीत पाच अब्जाधीश होते ज्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या पाणबुडीमध्ये केवळ काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक असल्याचं बोललं जात आहे. त्यात शोधकार्यात वेळ निघून जात असल्याने पाणबुडीतील लोकांच्या जगण्याच्या आशाही मावळल्या आहेत.
टायटन एक छोट्या कॅप्सुलच्या आकाराची पाणबुडी आहे ज्याची कमाल क्षमता ५ लोकांची आहे. ज्यावेळी ही पाणबुडी गायब झाली त्यात ५ जण प्रवास करत होते. पाणबुडीचा आकार ६.७ मीटर लांब, २.८ मीटर रुंद, २.५ मीटर उंच आहे. त्यात ९६ तासांचा ऑक्सिजन आहे. पाणबुडीत बसण्यासाठी सीट नसून एक सपाट तळ आहे ज्यावर ५ जण बसू शकतात. २१ फूट लांब पाणबुडीत पसरण्यासाठीही जागा नाही. पाणीबुडीतील लोकांकडे मर्यादित जेवण आणि पाणी आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणबुडीतून बाहेर बघण्यासाठी २१ इंच व्यासाची खिडकी आहे. टायटॅनिकपर्यंत पोहचून परत येण्यासाठी ८ तास लागतात. टायटॅनिकचे अवशेष १२५०० फूट समुद्राच्या खोलीत आहेत. त्याठिकाणी जायला २ तास, टायटॅनिक पाहण्यासाठी ४ तास आणि परत येण्यासाठी २ तास असा वेळ लागतो. पाणबुडीला रविवारी समुद्रात उतरवण्यात आले. परंतु १ तास ४५ मिनिटांनी जहाजासोबत त्यांचा संपर्क तुटला. पाणबुडी अमेरिकन किनाऱ्यापासून ९०० नॉटिकल माइल्स अंतरावरून बेपत्ता झाली आहे.
पाणबुडीचा संपर्क तुटल्यानंतर अमेरिकेने तिच्या शोधासाठी मोठं सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे जे अद्याप सुरू आहे. या शोध मोहिमेत अमेरिका, कॅनडासह मोठ्या कंपन्या ज्या समुद्राच्या खोलाशी जाऊ शकतात त्यांचाही सहभाग आहे. पाणबुडी, सैन्य विमान, सोनार बॉयच्या मदतीने पाणबुडीचा शोध घेतला जात आहे. त्याचसह रोबोट्सही मदतीला आला आहे. सोनार बॉय असं एक यंत्र आहे ज्याद्वारे ध्वनी लहरी पाठवून समुद्राखालील वस्तू शोधल्या जातात. खोल पाण्यात शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.
समुद्रात बचाव कार्य इतके अवघड का?बचाव कार्याची सर्वात मोठी अडचण ही आहे की शोधमोहिम समुद्राच्या तळाशी करायची का समुद्राच्या पृष्ठभागावर बचाव कार्याला गती द्यायची. प्रत्येक वळणावर त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. समुद्रावरील बचाव कार्य हे जमिनीवरील बचाव कार्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण असते. इंग्लंडमधील कीले विद्यापीठातील फॉरेन्सिक जिओलॉजीचे लेक्चरर जेमी प्रिंगल यांनी सांगितले की, पाण्यात बचाव कार्य करणे खूप कठीण आहे. 'याचं कारण म्हणजे समुद्रात अतिशय आव्हानात्मक वातावरण असते. त्यात पाण्याच्या अनेक पातळ्या आहेत, लाटा असतात आणि समुद्राचा तळही जमिनीच्या तुलनेत खूप खडबडीत असतो.
टायटन सापडेल वाटत नाहीखोल पाण्यात सोनारच्या मदतीने पाणबुडीचा शोध लागू शकतो. परंतु इतक्या विशाल समुद्रात पाणीबुडी शोधण्याला खूप वेळ लागेल आणि पाणबुडीतील लोकांकडे अजिबात वेळ नाही. तज्ज्ञांनुसार, टायटनला शोधले तरी त्यातील लोकांना वाचवणे खूप कठीण आहे. पाणबुडी तळाशी गेलेली असेल ती शोधली तरी त्यातून जिवंत लोकांना बाहेर काढणे अशक्य आहे. खूप कमी जहाज इतक्या तळाशी जातात. बचावासाठी बनवण्यात आलेले नौदलाची जहाजे, पाणबुड्याही टायटॅनिकच्या खोलापर्यंत जाऊ शकत नाही. एक एक क्षण महत्त्वाचा आहे. समुद्राच्या खोलाशी जाणे म्हणजे अंतराळात जाण्यासारखे आहे. शोध कठीण आहे आता चमत्काराची गरज आहे, समुद्रात चमत्कार होत राहतात असं डेविड गॅलो यांनी सांगितले.
टायटॅनिक दुर्घटना कधी घडली?टायटॅनिक दुर्घटना आतापर्यंत समुद्रातील सर्वात मोठा अपघात मानला जातो. १४ एप्रिल १९१२ रोजी अर्ध्या रात्री एका महाकाय हिमनगाला धडकून हे अतिशय मोठे जहाज अटलांटिक महासागरात बुडाले. या भीषण दुर्घटनेवेळी टायटॅनिक ४१ किमी प्रति तास वेगाने न्यूयॉर्कच्या दिशेने जात होते. हा त्या जहाजाचा पहिलाच प्रवास होता. जहाजात १३०० प्रवासी आणि ९०० कर्मचारी असे एकून २२०० जण होते. त्यातील १५०० लोकांचा जीव गेला.