मिलवॉकी : अमेरिकेतील मिलवॉकी शहरात रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन स्थळाजवळ (आरएनसी) हवेत चाकू फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला ओहायो पोलिस अधिकाऱ्यांनी गोळ्या घातल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ट्रम्प यांच्या हत्येचा हा आणखी एक कट होता की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिवेशन स्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या किंग पार्कजवळ ही घटना घडली. मिलवॉकीचे पोलिस प्रमुख जेफ्री नॉर्मन यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, घटनास्थळी कामावर असलेल्या ओहायोच्या पाच पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही हातात चाकू धरलेल्या एका व्यक्तीला थांबण्यास सांगितले. परंतु, त्याने त्यांचे ऐकले नाही आणि एका नि:शस्त्र व्यक्तीवर हल्ला केला. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. घटनास्थळावरून दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत. या घटनेबाबत स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
हेली, रामस्वामींचा पाठिंबा
भारतीय - अमेरिकी रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी अध्यक्षीय निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शविला. असे करून त्यांनी अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांच्याविरूद्ध कटू लढत दिल्याच्या पार्श्वभूमीवर ऐक्याचा संदेश दिला. दरम्यान, विवेक रामास्वामी यांनीही अमेरिकी लोकांना राष्ट्रीय स्वाभिमान आणि अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी ट्रम्प यांना मतदान करण्याचे आवाहन अधिवेशनादरम्यान केले.
ट्रम्प यांनी हस्तांदोलनही टाळले
मंगळवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प पक्षाच्या अधिवेशनस्थळी कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात पोहोचल्यानंतर त्यांनी लोकांशी हस्तांदोलन करण्याऐवजी आपली मूठ उंचावली.
मी ट्रम्पबद्दल सत्य बोलणे थांबवणार नाही : बायडेन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राजकीय वक्तृत्त्वातील कटुता कमी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्याचा अर्थ मी त्यांच्याविषयी सत्य बोलणे बंद केले, असा होत नाही, असे त्यांनी लास वेगासमधील एनएएसीपी अधिवेशनात स्पष्ट केले.