लाहोर : मला देशद्रोहाच्या आरोपाखाली पुढील १० वर्षे तुरुंगात डांबण्याचा पाकिस्तानी लष्कराचा डाव आहे. मात्र वाईट प्रवृत्तींविरोधात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी लढत राहीन, असे पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
खटल्यांच्या सुनावणीसाठी इम्रान खान लाहोर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीसाठी हजर झाले. त्याआधी इम्रान खान यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अटकेत असताना उसळलेल्या हिंसाचाराचे निमित्त करून एक कट शिजविण्यात आला. माझी पत्नी बुशरा बेगम हिला तुरुंगात टाकण्याचा तसेच देशद्रोहाच्या आरोपाखाली मला पुढील दहा वर्षे कारावासाची शिक्षा देण्याचे लष्कराने ठरविले आहे.
इम्रान खान प्रमुख पीटीआय या पक्षाच्या नेत्यांची लाहोर येथे सोमवारी बैठक झाली. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर सध्या १०० पेक्षा अनेक गुन्हे दाखल असून, त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
आज पुन्हा अटक होणार?इम्रान खान यांनी सांगितले की, मला उद्या, मंगळवारी पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात येईल, अशी शक्यता आहे.