गयान : अफगाणिस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भीषण भूकंपात हजारांहून अधिक लोक ठार झाले. अनेक लोक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी जिवंत राहिलेल्या लोकांनी आपल्या हाताने ढिगारा उपसून आपले प्राण वाचविले. या आपत्तीनंतर अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. त्याची ४.३ रिश्टर तीव्रता होती. या देशातील भूकंपग्रस्तांच्या बचावकार्यासाठी तालिबान राजवटीने फारसे काहीही केलेले नाही. ते आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत स्वीकारतील का याबद्दलही अनिश्चितता आहे. पक्तिया प्रांतातील गयान जिल्ह्याला बुधवारच्या भूकंपाचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळे कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्यातून आपल्या संसाराच्या उरलेल्या वस्तू लोक गोळा करत आहेत. जे या भूकंपातून वाचले ते आपल्या सगेसोयऱ्यांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दशकांत झालेला हा सर्वात भीषण भूकंप आहे. त्यात १५००हून अधिक जण जखमी झाले. अमेरिकी व दोस्त राष्ट्रांच्या फौजा अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर तालिबानींनी तिथे सत्ता काबीज केल्याच्या घटनेस १० महिने उलटले आहेत. मात्र या कालावधीत तेथील बेकारी, गरिबीची समस्या कमी झालेली नाही. त्यातच या भूकंपाचे संकट उद्भवल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जुनी घरे भूकंपात कोसळली. मात्र आधुनिक इमारतींनी टिकाव धरला आहे. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानचे ३० जण ठार : अफगाणिस्तानमधील भूकंपात पाकिस्तानमधील मदखेल आदिवासी जमातीचे ३० जण मरण पावले आहेत. २०१४ साली झालेल्या लष्करी कारवाईच्या वेळी हे लोक अफगाणिस्तानमध्ये पळून गेले होते. उत्तर वझिरिस्तानातील हे मूळ रहिवासी आहेत.
दरवर्षी २० हजार भूकंपाचे धक्केदरवर्षी जगात २० हजार भूकंपाचे धक्के बसतात. त्यातील १०० भूकंपाचे धक्के तीव्र क्षमतेचे असतात. त्यांच्यामुळे नुकसान होते, अशी माहिती नॅशनल अर्थक्वेक इन्फर्मेशन सेंटरने दिली. जगाच्या इतिहासात सर्वात जास्त वेळेचा भूकंप २००४ साली हिंद महासागरात झाला होता. त्याचे धक्के १० मिनिटे बसत होते.