कीव्ह : युद्धाच्या दहाव्या दिवशी युक्रेनमधील मारियुपोल, वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये रशियातर्फे शनिवारी सात तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. मात्र रशियाकडून काही भागात गोळीबार सुरू राहिल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम थांबविण्यात आले, असा दावा युक्रेनने केला. तिथे अडकलेल्यांमध्ये शेकडो भारतीय आहेत.
मारियुपोल, वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजल्यापासून युद्धविरामाला प्रारंभ झाला. युक्रेनच्या युद्धग्रस्त भागांत अडकलेले भारतीय व अन्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निघून जाण्यासाठी मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत नुकतेच सांगितले होते. या कामासाठी रशिया, युक्रेनने युद्धविराम घ्यावा, अशी मागणी भारताने केली होती. रशिया व युक्रेनने युद्धविराम केल्यास सुमी व इतर शहरांतून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी वेगाने प्रयत्न करता येतील असे भारताने म्हटले. सुमी व पिसोचिन येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी जिथे आश्रय घेतला आहे तिथेच राहावे. धोका पत्करू नये. या विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे प्रयत्न जारी असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले. (वृत्तसंस्था)
जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडलीn मारियुपोल, खारकीव्ह, वोल्नोवाखा आदी ठिकाणांना रशियाच्या सैनिकांनी वेढा दिला असून, जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडली आहे. n त्यामुळे नागरिकांचे विलक्षण हाल होत आहेत. रशियाने मारियुपोल, वोल्नोवाखा शहरांपुरता काही तासांचा युद्धविराम केला होता. मात्र, युक्रेनच्या अन्य भागांमध्ये हल्ले सुरूच ठेवले होते.
फिनलंड-अमेरिका भेटरशियाने, युक्रेनवर केलेले आक्रमण अन्यायकारक असल्याचे अमेरिका व फिनलंड या देशांचे मत आहे. अमेरिकेने, युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठविण्यास याआधीच नकार दिला आहे. मात्र युक्रेनला आर्थिक व इतर प्रकारची मदत करण्यास अमेरिकेने पुढाकार घेतला आहे.