माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेशिवाय हटणार नाही म्हणत इस्लामबादमध्ये घुसणाऱ्या पीटीआयच्या समर्थकांनी राजधानीलाच घेराव घातला आहे. इस्लामाबादचे रस्ते कंटेनर उभे करून बंद करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सरकारने केला होता. परंतू, उसळलेल्या हिंसाचारात सहा पोलीस ठार झाल्याने सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. परंतू, जे व्हिडीओ समोर येत आहेत त्यात सैन्याचे जवान, अधिकारी आंदोलकांना मिठ्या मारणे, हस्तांदोलन करणे, कंटेनरवर चढण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. हे पाकिस्तानात सत्तापालट होण्याचे संकेत दिसत आहेत.
आंदोलकांना थांबविण्यासाठी इस्लामाबाद कंटेनर सिटीमध्ये रुपांतरीत झाली आहे. इम्रान खानचे हजारो समर्थक इस्लामाबादच्या डी चौकात येण्यात यशस्वी ठरले आहेत. यावेळी अनेक सैनिक या लोकांना मिठ्या मारताना दिसत होते. पाकिस्तानी सैन्य कोणत्याही क्षणी पारडे बदलू शकते, त्यात जनतेचा संताप पाहता पाकिस्तानी सैन्य ही भूमिका घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
इम्रान यांची रहस्यमयी पत्नी बुशरा बीबी आणि खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अमीन गंडापूर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. लाखो समर्थक इस्लामाबादकडे निघाले आहेत. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. परंतू हिंसाचारात सहा पोलिसांचा मृत्यू झाला. तर ७० जखमी झाले आहेत. अनेक पोलिसांना या समर्थकांनी ओलीसही ठेवले आहे.
मंगळवारी सैन्याला पाचारण करण्यात आले असून आंदोलक दिसताच त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. परंतू, सैन्याने आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे सोडून त्यांचे स्वागत करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांचे सरकार उलथवून लावले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच याला पाकिस्तानी सैन्याची मदत होत असल्याची शंकेची पालही अनेकांच्या मनात चुकचुकू लागली आहे.