आफ्रिका खंडातील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या मालीमध्ये गुरुवारी एका लष्करी तळाला आणि एका बोटी लक्ष्य करून आत्मघाती हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार नायजर नदीतील एक बोट आणि उत्तर गाओ क्षेत्रातील बंबा येथे एका लष्कराच्या तळाला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये एकूण ६४ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ४९ जण नागरिक तर १५ सैनिक होते.
प्रत्येक हल्ल्यात किती नागरिक मारले गेले आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. एएफपीच्या रिपोर्टनुसार अल कायदाशी संबंधित असलेल्या एका समुहाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बोटीचे संचालक कोमानव यांनी सांगितले की, बोट नदीच्या किनारी असलेल्या शहरांमधील ठरलेल्या मार्गावरून जात होती. त्यावेळी तीन रॉकेटच्या माध्यमातून बोटीला लक्ष्य केले गेले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंनुसार नायजर नदीच्यावर काळ्या धुराचा ढग तयार झालेला दिसत आहे. कोमानवच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सदर बोट नदीच्या किनाऱ्यावर होती. तसेच लष्कर प्रवाशांना उतरवत होते. नायजर नदी ही या भागातील वाहतुकीचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.