इस्रायलच्या तेल अवीव उत्तर जवळील ग्लियोट येथे एका ट्रकने बस स्टॉपला धडक दिली. या हल्ल्यात 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यासंदर्भात इस्रायली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. इस्रायली रुग्णवाहिका सेवा मेगन डेव्हिड ॲडमने दिलेल्या माहिती नुसार, 35 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्या भागात ही घटना घडली त्याच भागात इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे मुख्यालय तसेच IDF चे अनेक गुप्तचर युनिट्स आहेत. यात हाय प्रोफाईल सिग्नल इंटेलिजन्स ग्रुप युनिट 8200 चाही समावेश आहे.
बसस्थानकावर धडकलेल्या ट्रकचा चालक मारला गेला आहे. इस्त्रायली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील लोकांनी ट्रक चालकावर गोळी झाडली आणि त्याला रोखले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रवाशांना उतरवण्यासाठी एक बस स्टेशनवर थांबली होती. याचवेळी एका ट्रकने बस आणि स्टॉपवर उपस्थित असलेल्या लोकांना धडक दिली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांना दहशतवादी हल्ल्याचा संशय -जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे पीडितांवर उपचार करत असलेल्या तेल अवीवमधील रुग्णालयाने म्हटले आहे. त्याच्यावर ऑपरेशन थेटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांना हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय असल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.