कोरोनाकाळानंतर जगभरात आजवर फार कधी समोर ना आलेले अनेक प्रश्न व्यवस्थांना सोडवावे लागत आहेत. महामारीच्या या काळाने लोकांच्या जगण्याची रीतच बदलून टाकली. कोविडोत्तर काळ अद्याप अधिकृतपणे आला नसला तरी निर्बंध शिथिल झाल्यानंतरही अनेक प्रश्न सुटलेले नाहीत किंबहुना अधिक जटील होऊन बसले आहेत.
सध्या अमेरिकेत आणि एकूणच जगभरात ट्रक ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना काळात ऑनलाइन वस्तू मागवण्यात झालेल्या प्रचंड वाढीमुळे देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत वस्तूंची वाहतूक वाढली. बहुतेक सगळ्या देशांमध्ये देशांतर्गत वाहतूक ही रस्त्यांवरून केली जाते. त्यामुळे सगळीकडेच ट्रकच्या वाहतुकीत वाढ झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रक्स चालवणाऱ्या लोकांची आजवर कधीच गरज पडलेली नसल्याने प्रशिक्षित ट्रक चालकांचा तुटवडा निर्माण झाला. त्याची सगळ्यात जास्त झळ अमेरिकेला बसली. याचं कारण अर्थातच अमेरिकेत जास्त प्रमाणात असलेली ऑनलाइन वस्तू मागवण्याची वृत्ती !
पण मग यावर उत्तर काय? एका कंपनीचा ड्रायव्हर जास्त पैसे देऊन दुसऱ्या कंपनीने पळवायचा, हे काही कायमचं उत्तर असू शकत नाही आणि त्यामुळेच जगातील अनेक कंपन्या ड्रायव्हरशिवाय चालणारे ट्रक्स बनवण्याच्या खटपटीत आहेत. त्यात सध्या तरी सॅन दिएगोमधील टुसिम्पल नावाच्या कंपनीने आघाडी घेतलेली दिसते आहे. टुसिम्पल ही कंपनी २०१५ मध्ये स्थापन झाली. आजघडीला या कंपनीचे ७० चालकविरहित ट्रक्स अमेरिका, चीन आणि युरोपच्या रस्त्यांवर धावत आहेत.
आजवर त्यांनी चालवलेल्या या सगळ्या ट्रक्सनी पार केलेलं अंतर मोजलं तर ते २० लाख मैल किंवा ३० लाख ६० हजार किलोमीटर्स इतकं भरतं. म्हणजेच त्यांनी इतका प्रचंड प्रवास चालकविरहित ट्रक्स वापरून आजवर केलेला आहे. त्यांचे आत्ताचे ट्रक्स हे नेहमीसारखेच ट्रक्स आहेत, त्यात फक्त टुसिम्पल कंपनीचं चालकविरहित ट्रक चालवण्याचं तंत्रज्ञान बसवलेलं आहे. मात्र, पूर्णपणे स्वयंचलित ट्रक्स बनवण्यासाठी टुसिम्पल कंपनीने जगातील दोन सगळ्यात मोठ्या ट्रक उत्पादकांशी करार केलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेतील नेव्हीस्टार आणि युरोपमधील फोक्स वॅगनची ट्रक व्यवसायाची शाखा असलेली ट्रॅटन. या दोन कंपन्यांच्या बरोबर काम करून २०२४ पर्यंत पूर्णपणे स्वयंचलित ट्रक्स तयार करता येतील, असा त्यांचा मानस आहे.
टुसिम्पलच्या लेटेस्ट रोड टेस्टमध्ये ताजा भाजीपाला आणि फळं ऍरिझोना राज्यातील नोगालीसपासून ते ओक्लाहोमा शहरापर्यंत पोहोचवण्यात आलं. या चाचणीचं अंतर होतं तब्बल ९५१ मैल, म्हणजेच १५३० किलोमीटर! या चाचणीच्या वेळी ट्रकमध्ये सामान भरणं आणि उतरवून घेणं, हे काम माणसांनी केलं; पण या एकूण प्रवासातील टस्कन ते डॅलस हा खूप मोठा प्रवास ट्रकने एकट्याने केला.टुसिम्पलचे अध्यक्ष आणि सीईओ चेंग लू म्हणतात की, ‘अजूनही आमची यंत्रणा पूर्णपणे तयार नसल्यामुळे आम्ही ट्रकबरोबर पूर्ण वेळ एक सेफ्टी ड्रायव्हर आणि एक सेफ्टी इंजिनिअर ठेवतो. मात्र, असं असेल तरीही आम्ही हा प्रवास पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने पूर्ण केला. ड्रायव्हरने स्टिअरिंग व्हीलला हातसुद्धा लावला नाही.’
एरवी हा प्रवास पूर्ण करायला ट्रकला २४ तास लागतात. स्वयंचलित ट्रकने हेच अंतर १४ तासांत पूर्ण केलं. त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ट्रकला झोप येत नाही! शिवाय अमेरिकेत कायद्याने ट्रक ड्रायव्हरला एका दिवसात अकरा तासांपेक्षा जास्त काळ ड्रायव्हिंग करता येत नाही; पण ट्रकला मात्र ही कुठलीच अडचण येत नाही. ट्रक दमत नाही आणि ट्रकला झोपसुद्धा येत नाही.