न्यूयॉर्क: सर्वसाधारणपणे आईच्या गर्भात ९ महिने ९ दिवस राहिल्यानंतर बाळाला जगाचे दर्शन होते. आपल्याकडे गर्भधारणा झाल्यापासून डोहाळ जेवणासारखे सोहळेही होतात. परंतु नवलाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील एका महिलेला प्रसूतीपूर्वी ४८ तासांपर्यंतही ती गर्भवती असल्याचे लक्षातही आले नव्हते.
अमोरिकेतील ओमाहा येथे शिक्षिका असलेल्या २३ वर्षीय पीटन स्टोव्हरच्या आयुष्यात ही धक्कादायक घटना घडली. पीटन यांना या काळात थकवा येण्याव्यतिरिक्त गर्भधारणेची कोणतीही लक्षणे क्वचितच जाणवली. नवीन नोकरी लागल्यामुळे कामाच्या रगाड्यात त्यांनी थकव्याकडे काहीसे दुर्लक्षच केले. पण बाळंतपणाच्या काही तास आधी त्यांच्या पायाला सूज आल्याने त्या रुग्णालयात गेल्या. कई टीव्हीच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी तपासून त्या गर्भवती असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना सर्वात मोठा धक्का बसला.
पती-पत्नी आनंदी-
डॉक्टरांनी एकदा नाही दोनदा चाचणी करून गर्भधारणेची पुष्टी केली. यानंतर मात्र स्टोव्हर आणि त्यांचे पती ट्रॅव्हिस कोस्टर्स खूप आनंदी झाले.
डॉक्टरांनी घेतली फिरकी-
१. या जोडप्याचे डॉक्टरांनाही नवल वाटले. मग त्यांनी गंमत म्हणून वातावरण थोडे गंभीर केले. पुढील १५ मिनिटांत बाळाचा जन्म होऊ शकतो, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे जोडप्याची पाचावर धारण बसली.
२. अखेर डॉक्टरांनी दोघांना विश्वासात घेऊन गरोदरपणाबद्दल कळल्यानंतर ४८ तासांनी सिझेरियन करून बाळाला जन्म दिला. हे बाळ दहा आठवडे आधीच जन्माला आले.
३. योगायोग म्हणजे स्टोव्हर यांचा वाढदिवसही त्याच दिवशी होता. बाळाचे वजन १ किलो ८०० ग्रॅम असून बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे.