मॉस्को : युक्रेन युद्धाविरोधात एक वर्षापूर्वी रशियातील एका शाळकरी मुलीने उत्तम चित्र काढले होते; पण हा पुतीन सरकारच्या लेखी गुन्हा होता; मात्र त्याची शिक्षा तिच्या वडिलांना मिळाली. आपल्या मुलीवर नीट संस्कार केले नाहीत, असा ठपका ठेवत वडिलांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा रशियातील न्यायालयाने सुनावली. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते; पण ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले आहेत.
ही शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव ॲलेक्सी मोस्कालयेव असून, त्यांच्या मुलीने शाळेत एक युद्धविरोधी चित्र काढले होते. मुलीच्या या गुन्ह्याबद्दल ॲलेक्सी यांच्याकडून पोलिसांनी ३२ हजार रुबल्सचा दंड वसूल केला होता. माशाच्या वडिलांना विनावॉरंट अटक करण्यात आली व मुलीची केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. ॲलेक्सीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. (वृत्तसंस्था)
पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक
वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकी वृत्तपत्राचे पत्रकार इव्हान गेर्शकोविच यांना हेरगिरीच्या आरोपावरून रशियाने गुरुवारी अटक केली. गोपनीय माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा रशियाने केला. संरक्षण खात्यातील महत्त्वपूर्ण माहिती मिळवून ते अमेरिकेला पुरविणार होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.