ऑनलाइन लोकमत
पोकेमॉनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यामुळे अॅपल ही कंपनी येत्या एक ते दोन वर्षांत जवळपास 3 अब्ज डॉलर्स कमावेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पोकेमॉन खेळणारे जास्त फीचर्स मिळावीत म्हणून अॅपस्टोअर मधून पोकेकॉइन्स विकत घेतात. हे प्रमाण वाढत असून त्यातून अॅपल भरपूर नफा कमावणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार अॅप स्टोअरवर 100 पोकेकॉइन्ससाठी 99 सेंट्स मोजावे लागतात, तर 14,500 पोकेकॉइन्स घेण्यासाठी 99.99 डॉलर्स लागतात. गेम मोफत डाऊनलोड होत असला तरी जास्तीच्या फीचर्ससाठी पोकेकॉइन्स लागतात, जी विकत घ्यावी लागतात.
अॅप स्टोअरच्या माध्यमातून पोकेमॉन गो साठी केलेल्या खरेदीपैकी 30 टक्के रक्कम अॅपल घेत असल्याचा अंदाज नीधाम अँड कंपनी ब्रोकरेज फर्मचे अॅनालिस्ट लॉरा मार्टिन यांनी व्यक्त केला आहे. लाँच झाल्यानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यातच पोकेमॉनच्या फक्त अमेरिकेतील अॅक्टिव युजर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे. यावरून पोकेमॉनची क्रेझ किती आहे याचा अंदाज येईल.
पैसे भरून किती जणांनी पोकेमॉन घेतलं याची तुलना करायची म्हटलं तर ती संख्या कँडी क्रशपेक्षा 10 पट असल्याचे मार्टिन यांनी नमूद केले आहे. 2013 व 2014 मध्ये कँडी क्रश हा तुफान गाजलेला खेळ होता आणि त्याने एक अब्ज डॉलर्सचं उत्पन्न मिळवून दिलं होतं. पोकेमॉन गो या बाबतीतही कँडी क्रशचा रेकॉर्ड मोडेल असा अंदाज आहे.
फेसबुक किंवा व्हॉट्स अॅपपेक्षा जास्त वेळ अमेरिकेतील यूजर्स पोकेमॉनवर घालवत असल्याचेही दिसन आले आहे.
पोकेमॉनच्या लाँचनंतर एकूणच मोबाईलशी संबंधित उपकरणांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचेही आढळले आहे. या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला असून अॅपलच्या शेअरचा भाव दोन आठवड्यात सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे.
आणखी वाचा