लिस्बन : २०१७ मध्ये, पोर्तुगालमधील पोंबल येथे एका घरमालकाला त्याच्या घराच्या अंगणात बांधकाम सुरू असताना काही हाडे सापडली. मालकाने लगेचच संशोधन पथकाशी संपर्क साधला. तिथे उत्खनन सुरू झाले. ऑगस्टमध्ये पोर्तुगीज व स्पॅनिश जीवाश्मशास्त्रज्ञांचे उत्खनन पूर्ण झाले आहे. सापडलेले अवशेष तब्बल ३९ फूट उंच आणि ८२ फूट लांब डायनासोरचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. युरोपमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा सॉरोपॉड असू शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सॉरोपॉड हे शाकाहारी डायनासोर होते ज्यांना चार पाय आणि लांब मान व मोठी शेपटी होती. अशाप्रकारे एखाद्या प्राण्याच्या सर्व फासळ्या एकत्र, तेही मूळ शारीरिक स्थितीत सापडणे ही सामान्य बाब नसल्याचे, लिस्बन विद्यापीठाचे संशोधक एलिझाबेथ मालाफिया यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
दक्षिण-पश्चिम चीनमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेरील अंगणात सुमारे १० कोटी वर्षांपूर्वीच्या दोन सॉरोपॉड डायनासोरच्या पायाचे ठसे संशोधकांना सापडल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर हे घडले आहे. सॉरोपॉड पृथ्वीवर सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते, असा शास्त्रज्ञ मानतात. सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा रंगली आहे.