सिडनी : आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट अविश्वास ठरावातून वाचले असून त्यांच्या नेतृत्वावरील संकट तूर्त टळले आहे. सत्ताधारी लिबरल पार्टीच्याच काही बंडखोर सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर अविश्वास दर्शविणारा प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव ६१ विरुद्ध ३९ मतांनी फेटाळला गेला. अबोट यांना या संकटातून मान सोडवून घेण्यात यश आले असले तरी आगामी काळात त्यांच्यासमोरील आव्हाने आणखी वाढतील, असे सूचक उद्गार अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या बंडखोर सदस्यांनी काढले आहेत. हा प्रस्ताव फेटाळला गेल्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न सुटणार नाही, असे सिडनी विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक पीटर चेन यांनी सांगितले. अबोट यांनी त्यांच्या घोषणेप्रमाणे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे नेतृत्वाचा मुद्दा काही काळ बाजूला पडेलही; मात्र तो संपणार नक्कीच नाही, असेही चेन म्हणाले. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर १८ महिन्यांतच अबोट यांना पक्षांतर्गत बंडाळीला सामोरे जावे लागले. गंभीर चुका, चुकीची धोरणे आणि लोकप्रियतेत घसरण यामुळे अबोट यांच्याविरुद्धचा पक्षांतर्गत असंतोष वाढत गेला. (वृत्तसंस्था)
अबोट स्वकीयांच्या अविश्वासातून तरले
By admin | Published: February 09, 2015 11:32 PM