गाझामध्ये हमासने ओलीस ठेवलेल्या एका 4 वर्षीय अमेरिकन मुलीची सुटका करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी याला दुजोरा दिला आहे. इस्रायलसोबतच्या युद्धविरामाच्या तिसऱ्या दिवशी हमासने 13 इस्रायली ओलीस, 3 थाय आणि एका रशियन ओलिसांची सुटका केली. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून या सर्वांना गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आले होते.
7 ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासने अबीगेल एडनच्या पालकांची हत्या केली आणि तिचे अपहरण केलं. अबीगेलचे भाऊ-बहीण मायकल (9) आणि अमालिया (6) यांनी 14 तास घराच्या एका कपाटात लपून आपला जीव वाचवला. या चार वर्षांच्या मुलीला जे सहन करावे लागले त्याबद्दल ज्यो बायडेन यांनी दु:ख व्यक्त करत अकल्पनीय असं म्हटलं आहे.
अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर हमास आणि इस्रायलने चार दिवसांच्या युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. या कराराअंतर्गत इस्रायल आपल्या तुरुंगात असलेल्या 150 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल, त्या बदल्यात हमास 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर ओलीस ठेवलेल्या 50 इस्रायली आणि परदेशी नागरिकांची सुटका करेल. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला केला, ज्यामध्ये 1200 लोक मारले गेले आणि 240 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले गेले.
ज्यो बायडेन यांनी आशा व्यक्त केली की, हमास लवकरच आणखी अमेरिकन ओलिसांची सुटका करेल. अमेरिकन नागरिकांच्या सुटकेमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला युद्धविराम वाढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक ओलीस परत येईपर्यंत आम्ही काम करणे थांबवणार नाही असं सांगून त्यांनी जनतेला धीर दिला.