वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियातील भारतीय वंशाच्या महिला व अमेरिकेतील महाधिवक्त्या कमला हॅरिस यांच्यात अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची क्षमता आहे, असे वृत्त येथील एका पोर्टलने दिले आहे. हिलरी क्लिंटन यांच्या पराभवाने अमेरिकेला पहिल्या महिला अध्यक्ष लाभणे थोडक्यात हुकल्याच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त देण्यात आले आहे. कमला हॅरिस या ५१ वर्षांच्या असून, त्या मंगळवारी कॅलिफोर्निया येथून अमेरिकी सिनेटवर निवडून गेल्या. सिनेटवर निवडल्या गेलेल्या त्या प्रांतातील पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई सदस्य आहेत. त्यांची आई चेन्नईची, तर वडील मूळचे जमैका येथील रहिवासी आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांची स्थलांतरविरोधी धोरणे आणि लोकांचे प्रत्यार्पण करण्याच्या मनसुब्यांविरुद्ध देशव्यापी अभियान सुरू केले आहे. हफिंग्टन पोस्टने कमला यांच्या लढाऊ बाण्यावर प्रकाश टाकला आहे. पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे की, कमला हॅरिस यांना भेटा. त्यांच्यात पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची क्षमता आहे. कॅलिफोर्नियाच्या लोकप्रिय महाधिवक्त्या कमला यांनी कॅपिटोल हिलमध्ये स्थान निर्माण केले असून, व्हाइट हाउस हे त्यांचे पुढचे लक्ष्य असू शकते. सिनेटची निवडणूक जिंकून कमला यांनी इतिहास घडविला आहे. कॅलिफोर्नियाच्या महाधिवक्त्या म्हणून त्यांनी प्रभावशाली काम केले असून, त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि उपराष्ट्राध्यक्ष जो बिदेन यांच्यासह डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख नेत्यांना प्रभावित केले आहे. कमला हॅरिस यांनी २०२०मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ नेते देशभरात त्यांची प्रतिमा निर्माण करू शकतात. कमला हॅरिस यांनी २०२०मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ नेते देशभरात त्यांची प्रतिमा निर्माण करू शकतात, असेही हफिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
कमला यांच्यात अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची क्षमता
By admin | Published: November 13, 2016 3:14 AM